भारत-पाकिस्तान मॅचची VIP तिकिटं तासभरात संपली, किंमत वाचून हैराण व्हाल
मुंबई,क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण त्यांना लवकरच भारतविरुद्ध पाकिस्तान मॅच पाहायला मिळणार आहे. क्रिकेट जगतातील सर्वात जास्त चर्चेतल्या मॅचेसमध्ये भारत-पाकिस्तान मॅचचा समावेश असतो.महत्त्वाचं म्हणजे 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप क्रिकेट स्पर्धा 2023 च्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे, ज्यामध्ये सर्वात महाग तिकिटं भारत-पाकिस्तान सामन्याची आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन चाहते तिकीट बुक करत आहेत. पीसीबीच्या म्हणण्यानुसार, भारत-पाक सामन्याची व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी तिकिटं बुकिंग सुरू झाल्यानंतर तासाभरातच विकली गेली आहेत. 2 सप्टेंबरला आशिया कपची पहिली मॅच भारत आणि पाकिस्तान दरम्यान होईल.भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचच्या तिकिटांची मागणी कायमच सर्वाधिक असते.
राजकीय कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान हे परस्परांच्या देशांत जाऊन द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. त्यामुळे आयसीसी वर्ल्ड कप किंवा इतर कुठल्या स्पर्धेतच या टीम आमने-सामने येतात. याचं कारण म्हणजे दोन्ही टीममधील मॅचवेळी पहायला मिळणारा क्रिकेटचा थरार एका वेगळ्याच स्तरावर असतो. हे दोन्ही देश राजकीय वैरी आहेत त्यामुळे त्यांच्या क्रिकेट सामन्यालाही त्याच पद्धतीचं स्वरूप येतं.
आशिया कपच्या मॅचेसमध्येही असाच थरार असतो. त्यामुळे पीसीबीने या सामन्यांच्या तिकिटांच्या किमती खूप वाढवल्या आहेत आणि त्यातून मोठी कमाई करण्याचाही प्रयत्न केला जात आहे.भारत-पाकिस्तान सामन्यातील तिकिटाच्या किमती किती?श्रीलंकेतील कँडी इथे खेळल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटाच्या किमती खूप वाढल्या आहेत. स्टेडियमच्या सामान्य स्टँडचे तिकीट 2500 रुपये आहे. एवढंच नाही तर स्टेडियमच्या व्हीआयपी स्टँडमध्ये सामना पाहणाऱ्यांकडून तिकिटासाठी 10 हजार रुपये आकारण्यात आले आहेत.
तर व्हीव्हीआयपी तिकिटांची 25 हजार रुपयांना विक्री झाली आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एवढी महागडी तिकिटं ठेवल्यानंतरही भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे तासाभरातच विकली गेली. व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी तिकिटे विकली गेल्याची माहिती पीसीबीकडून देण्यात आली आहे. यावरून भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल लोकांमध्ये किती क्रेझ आहे हे दिसून येतं.भारत व पाकिस्तान दोनदा समोरासमोर येणार?या वेळी पाकिस्तान आणि श्रीलंका संयुक्तपणे आशिया कप 2023 चं आयोजन करत आहेत. हे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, पण भारतीय टीम पाकिस्तानात खेळणार नसल्याने आशिया कप स्पर्धेचे यजमानपद हायब्रिड करण्यात आले. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे 2 सप्टेंबरच्या मॅचशिवाय भारतीय संघ आणखी 2 वेळा पाकिस्तानविरोधात खेळू शकतो, ज्यामुळे आशिया कपचा उत्साह वाढू शकतो.