ठाकरे विरुद्ध ठाकरे. आदित्य आणि अमित यांच्यात जुंपली; दोघांचे एकमेकांवर वार प्रहार; नेमकं काय घडलं?
मुंबई | 19 ऑगस्ट 2023 :मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.भाजप निवडणूक घ्यायला घाबरत असल्यानेच ही निवडणूक स्थगित केली असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मनसे, ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या मुद्द्यावरून भाजपला घेरलेलं असतानाच आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पाहायलाही मिळत आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सिनेट निवडणुकीवरून मनसेवर टीका केल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनीही थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच नाव घेऊन आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्याने आता अमित विरुद्ध आदित्य अशी जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांना मनसेबाबत विचारण्यात आलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मनसेवरही टीका केली. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशी म्हण आहे. ज्यांना माहिती नाही त्यात कशाला जायचं. काही लोकांना थेरपीची गरज असते. प्रेमाची गरज असते. ते मी त्यांना देत असतो. भाजपमधून त्यांना ते मिळत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.