मोदींविरुद्ध आगपाखड करणारी व्यक्ती.”, अजित पवारांवरील ‘त्या’ टीकेवरून मिटकरींचा राज ठाकरेंना टोला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, असं म्हटल्यानंतर हे सगळेजण टुणकन भाजपाबरोबर गेले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
कोहिनूर मीलसंदर्भात ईडीची नोटीस आल्यानंतर राज ठाकरेंनी ज्याप्रकारे टुणकन उडी मारली, तशी टुणकन उडी मारणारा आमचा पक्ष नाही, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
राज ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेबाबत विचारलं असता अमोल मिटकरी म्हणाले, “कोहिनूर मीलसंदर्भात ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी (राज ठाकरे) ज्याप्रकारे टुणकन उडी मारली, तशी टुणकन उडी मारणारा आमचा पक्ष नाही. आम्ही सत्तेबरोबर आहोत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी आणि भाजपाविरुद्ध आगपाखड करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा कोहिनूरच्या माध्यमातून ईडीची नोटीस येते. मग ते विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपली भूमिका बदलतात. त्याचा परिणाम म्हणून ते महाराष्ट्राच्या पटलावर कुठेही दिसत नाहीत.”राज ठाकरेंकडे फक्त एकच आमदार आहे. तो आमदार त्यांनी सांभाळून ठेवावा. त्यांनी अजित पवारांची मिमिक्री करु नये. त्यांची मिमिक्री आम्हालाही करता येते. पण आम्ही काही बोललो की, त्यांची टोळधाड सुटते. त्यामुळे जे लोक ईडीची नोटीस मिळाल्यावर भूमिका बदलतात, त्यांनी अजित पवारांवर भाष्य करणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे,” असा टोला अमोल मिटकरींना लगावला.राज ठाकरे म्हणाले, अजित पवारांना विचारलं की आपण या सरकारमध्ये का आलात? त्यावर ते म्हणाले “महाराष्ट्राचा विकास करायला आलोय”. अरे कशाला खोटं बोलताय. ६ दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी काढली ना तुमची. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मग हे सगळेजण टुणकन इथे (भाजपाबरोबर) आले. कारण, छगन भुजबळांनी अजित पवारांना सांगितलं असणार. आत (तुरुंगात) काय काय असतं? जाऊ नका. आपण हवं तर इथे (भाजपाबरोबर) जाऊ पण तिथे (तुरुंगात) नको.