भंगार विक्रीतून मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग मालामाल; ९.३७ कोटींची कमाई
अमरावती : भंगार विक्रीतून मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग मालामाल झाला आहे. भंगाराची विल्हेवाट लावण्याकरिता मध्य रेल्वेमार्फत शून्य भंगार मोहिम राबवण्यात येते. या मोहिमेंतर्गत जुलै २०२३ मध्ये ३४७.६७ मेट्रिक टन भंगाराची विक्री करण्यात आली असून, १.६३ कोटींचा महसूल जमा झाला.
या कालावधीत एकूण १७४३.६७ मेट्रिक टन भंगाराची विल्हेवाट लावण्यात आली असून त्यातून ९.६७ कोटींचा महसूल जमा झाला आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकांच्या परिसरातील भंगाराची विक्री करून महसूल मिळवला आहे. कार्यशाळा, आगारे, कारखाने, रेल्वे परिसरातील निरुपयोगी रूळ, मोडीत काढलेले डबे, वाघिणी, इंजिने, रुळाचे साहित्य, चाके, पोलादी खांब व इतर धातूच्या वस्तूंची विक्री करण्यात आली आहे. रेल्वेच्या कार्यशाळा आणि शेडमधील भंगार विकण्यात येते. या मोहिमेमुळे भंगाराने अडवून ठेवलेली जागा स्वच्छ होत आहे.