मुंबईत घर नव्हते, आज अलिशान फ्लॅट आणि गाडी, यशस्वी जैस्वालच्या संपत्तीत झपाट्याने वाढ
टीम इंडियाची युवा सेन्सेशन यशस्वी जैस्वालची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चमक दाखवल्यानंतर त्याला भारतीय संघातही खेळण्याची संधी मिळाली आणि आता वेस्ट इंडिज दौऱ्यावरही शानदार कामगिरी केली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने उत्कृष्ट शतक झळकावले. त्याचवेळी, टी-20 मालिकेतही त्याने ८४ धावांची तुफानी इनिंग खेळून सर्वांना चकित केले. त्याच्या दमदार खेळामुळे तो टीम इंडियाचा भावी स्टार मानला जात आहे.
मात्र, यशस्वीला इथपर्यंत पोहोचणे अजिबात सोपे नव्हते. २१ वर्षांच्या यशस्वीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. यशस्वी जैस्वाल क्रिकेटर होण्यासाठी भदोहीहून मुंबईत आल्यावर पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करत असे. त्याच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे घरही नव्हते. कितीतरी रात्री त्याने तंबूत झोपून काढल्या आहेत, पण आता दिवस बदलले आहेत.
यशस्वी आपल्या मेहनतीने आज करोडोंचा मालक झाला आहे. त्याच्याकडे एक आलिशान कार आणि एक आलिशान घर आहे जे त्याने नुकतेच विकत घेतले आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या भावी स्टारची नेट वर्थ किती आहे हे जाणून घेऊया.
यशस्वी जयस्वालची एकूण संपत्ती किती आहे?
यशस्वी जैस्वालची क्रिकेटमधील चमक अंडर-19 पासूनच दिसून आली. यशस्वीने अंडर-19 विश्वचषकात धडाकेबाज कामगिरी केली होती, ज्यामुळे त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. त्यानंतर तो आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने २ कोटी ४० लाखांना सामील झाला. २०२१ च्या आयपीएलमध्येही राजस्थानने यशस्वीला त्याच किंमतीत कायम ठेवले.
मात्र, २०२२ मध्ये राजस्थानने त्याला ४ कोटींची मोठी रक्कम देऊन आपल्यासोबत कायम ठेवले. यशस्वीला 2023 च्या आयपीएलमध्येही तेवढीच रक्कम मिळाली होती. अशाप्रकारे त्याने गेल्या तीन वर्षांत केवळ आयपीएलमधून १२ कोटी ८० लाखांची कमाई केली.
याशिवाय तो सतत मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे आणि चांगली कामगिरीही करत आहे. इथूनही तो मॅच फी म्हणून लाखोंची कमाई करतो. त्याचबरोबर आयपीएलमध्ये खेळल्यामुळे यशस्वीला जाहिरातीतूनही चांगले पैसे मिळतात.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी पदार्पण केल्यानंतर यशस्वीने ठाणे, मुंबई येथे ५ बीएचके आलिशान फ्लॅट खरेदी केला असून, त्याची किंमतही कोट्यवधींमध्ये बोलली जात आहे. याशिवाय त्याच्याकडे एक आलिशान कारही आहे. अशाप्रकारे, रिपोर्टनुसार, यशस्वी जैस्वाल आपल्या छोट्या करिअरमध्ये जवळपास २५ कोटींचा मालक बनला आहे.