देशाच्या प्रगतीसाठी मोदींशिवाय पर्याय नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जेजुरी : आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशाचा मानसन्मान वाढविला आहे. याचा प्रत्येक भारतीयांना स पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. राज्याच्या विकासासाठी एका वर्षात हजारो कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. केंद्राच्या पाठबळावरच राज्याचा विकास होत असतो. त्यामुळे आम्ही विकासासाठी हा मार्ग स्वीकारला आहे. देशाला पुढे न्यायचे असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेजुरी येथे केले.
महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत ‘शासन आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत ‘योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी’ या उपक्रमाचा शुभारंभ आणि तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते जेजुरीच्या पालखी मैदानावर सोमवारी (दि. 7) करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जेजुरी गडावर जाऊन श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतले. तसेच गडावर विकासकामांचे भूमिपूजन केले.
या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, आमदार दत्तात्रय भरणे, अशोक पवार, संजय जगताप, राहुल कुल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी परिस्थिती सर्वत्र होती. सर्वसामान्य जनतेला एका छताखाली सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी हा ऐतिहासिक उपक्रम राज्यात राबविला जात असून, याला संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. जेजुरीच्या या कार्यक्रमात जिल्ह्यातून 22 लाख 61 हजार लाभार्थींची नोंद झाली आहे. जेजुरी देवसंस्थानच्या विकासाबरोबरच राज्यातील शक्तिपीठांचा विकास हाती घेतला आहे. विरोधक या योजनेवर टीका करत आहेत. त्यांची पोटदुखी वाढली आहे. ही पोटदुखी बरी होण्यासाठी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ राज्यातील 700 ठिकाणी सुरू करण्यात आला आहे, अशी खोचक टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जेजुरीत लोकदैवत, कुलदैवत खंडोबा देवाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. देवाचा भंडारा माथी लावून, भंडारा उधळून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना आशीर्वाद दे आणि त्यांची सेवा करण्यासाठी मुख्यमंत्री यांनाही आशीर्वाद दे. राज्यात विठोबा व खंडोबा देवाला केलेली प्रार्थना फळाला येते. जेजुरी तीर्थक्षेत्र विकासातील कामे सुंदर आणि परिपूर्ण होऊन भाविकांना सुखसोयी मिळतील, असे त्यांनी सांगितले.
शेती, आरोग्य, महिला विकास, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन देवेंद्र फडणवीस यांनी पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे सांडपाणी 100 टक्के प्रक्रिया करून ते उद्योगाला दिले जाईल, तसेच उद्योगातून वाचलेले पाणी शेतीसाठी देण्याची सिंचन योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र शासनाच्या मदतीतून राज्यात विमानतळ, रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण, राष्ट्रीय महामार्ग, पालखी महामार्ग, बस स्थानके यांची कामे सुरू झाली आहेत. उपसा योजनेचे वीजबिल पुन्हा कमी करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकर्यांचा फायदा झाला आहे. गुंजवणी धरणाचे पाणी पुरंदरला लवकर येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशातील साखर कारखान्यांचा आयकर प्रश्न केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी सोडविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतिपथावर चालला असल्याचे पवार यांनी सांगितले.
विमानतळासाठी शिवतारे आणि जगताप यांनी सहकार्य करावे : फडणवीस
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यात विमानतळ होण्यासाठी केंद्र सरकारने सर्व परवानग्या दिल्या आहेत. हे विमानतळ झाल्यास जिल्ह्याचे अर्थकारण, शेती, उद्योग आणि व्यवसाय यांची वृद्धी होणार आहे. आमदार संजय जगताप आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.