अमेरिकेने लपवून ठेवले एलियन्सचे मृतदेह; माजी नेव्ही अधिकाऱ्याचा थेट संसदेत दावा!
परग्रहावर राहणारे सजीव, म्हणजेच एलियन्सबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात कुतूहल असतं. हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये आपण कित्येक वेळा एलियन्सनी अमेरिकेवर हल्ला केल्याचं पाहिलं आहे.
मात्र, एलियन्स खरोखरच अमेरिकेत दाखल झाले होते असा दावा एका माजी अधिकाऱ्याने केला आहे.
अमेरिकेच्या संसदेत काही दिवसांपूर्वी यूएफओ आणि एलियन्सबाबत सुनावणी पार पडली. यावेळी अमेरिकेच्या नौदलातील माजी अधिकारी मेजर (नि.) डेव्हिड ग्रश यांनी हा दावा केला. ते म्हणाले, की अमेरिका कित्येक वर्षांपासून एलियन्सबाबत माहिती लपवून ठेवत आहे. तसंच या यूएफओंचे रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं जात आहे; असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
निवृत्त मेजर ग्रश हे २०२२ सालापर्यंत अमेरिकेच्या डिफेन्स एजन्सीमधील UAP विभागात कार्यरत होते. यूएफओ संबंधित संदिग्ध घटनांबाबत हा विभाग तपास करतो. “सरकारला १९३० साली एक उडती तबकडी मिळाली होती. यासोबतच एक मृतदेह देखील मिळाला होता जो माणसांचा नव्हता. तेव्हापासूनच अमेरिकेने ही बाब जगापासून लपवून ठेवली आहे; आणि या गोष्टींवर रिसर्च सुरू आहे.” असं ग्रश म्हणाले.
आपल्या जीवाला धोका
या खुलाशानंतर ग्रश यांनी सांगितलं, की जेव्हापासून ते या गोष्टींबाबत उघडपणे बोलत आहेत; तेव्हापासून त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो आहे. प्रोफेशनल आणि पर्सनल अशा दोन्ही स्तरांवर त्यांना विरोधाला सामोरं जावं लागत आहे. सोबतच, यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याचंही ते म्हणाले.
अमेरिकेतील राईट-पॅटर्सन बेस
एलियन्सचा दावा करणारे ग्रश हे पहिलेच अधिकारी नाहीत. यापूर्वीही अमेरिकेच्या लष्करातील कित्येक अधिकाऱ्यांनी एलियन्सच्या अस्तित्वाचा दावा केला आहे. अमेरिकेतील एरिया-५१ आणि राईट-पॅटर्सन बेस या दोन ठिकाणी एलियसन्सवर प्रयोग होत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी यापूर्वी केला आहे.
अमेरिकेने फेटाळला दावा
दरम्यान, अमेरिकेची सुरक्षा संस्था पेंटागॉनने हे सर्व दावे फेटाळले आहेत. अमेरिकेने अशा प्रकारची कोणतीही मोहीम राबवली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.