१९ वर्षीय मुलीशी जबरदस्तीने केलं लग्न, शारीरिक अत्याचार; गुन्हा दाखल
घारगाव : १९ वर्षीय मुलीची मानसिक स्थिती ठिक नसताना तिची फसवणूक करण्यात आली. २३ वर्षीय मुलाने त्याचे पहिले लग्न झाले असताना देखील या मुलीशी जबरदस्तीने लग्न केले, तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.संगमनेर तालुक्याचा ग्रामीण भाग आणि पुणे जिल्ह्यातील आळंदी, जुन्नर येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी पिडित मुलीने संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
केशव बबन काळे (वय २३, रा. कुरकुंडी, ता. संगमनेर ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावात १९ वर्षीय पिडित मुलगी राहते. तिची मानसिक स्थिती ठिक नसताना काळे याने तिला धमक्या दिल्या. त्याचे पूर्वी लग्न झालेले असताना त्याने मुलीशी जबरदस्तीने लग्न केले. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर सुद्धा बळजबरीने त्याने मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक अत्याचार केले. असे पिडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर अधिक तपास करीत आहेत.