Maharashtra ATS ने चौकशीसाठी रत्नागिरीतून एकाला उचललं, पुण्यातील संशयित दहशवादी प्रकरणात कारवाई
रत्नागिरी: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra ATS) रत्नागिरीतील एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरुन पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन संशयितांना अटक केली होती.
त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने आता रत्नागिरीतील एका व्यक्ती चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या नवी मुंबई युनिटने या व्यक्तीला पकडलं असून त्याची चौकशी सुरु आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तसंच या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचं आढळल्यास त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्याने नमूद केलं.
दोन संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीतून अनेक नावं समोर
दरम्यान महाराष्ट्र एटीएसने अलिकडेच (22 जुलै) पुण्यात अटक केलेल्या दोन संशयित दहशतवादी प्रकरणाचा तपास हाती घेतला. तपासादरम्यान दोघांच्या चौकशीतून आणखी काही लोकांची नावं समोर आली आहेत. त्यानंतर एटीएसच्या पथकाने अनेकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे, असंही अधिकाऱ्याने पुढे सांगितलं.
गस्तीदरम्यान दोन अतिरेकी अटकेत, एक जण पळून जाण्यात यशस्वी
मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ या दोन दहशतवाद्यांना मागील सोमवारी मध्यरात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सनी संशयास्पद हालचाली जाणवल्याने पकडले. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम हा यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाला. अटकेतील दोघांना 5 ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली.
वॉण्टेड दहशतवाद्यांवर एनआयएकडून इनाम
तत्पूर्वी या तीनही दहशतवाद्यांनी राजस्थानमधील जयपूर इथे घातपात करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) त्यांचा शोध घेत होती. एनआयएने मोहम्मद शहनवाज आलम याच्यावर पाच लाख रुपयांचे इनाम देखील जाहीर केले आहे. हे दोघं 15 महिन्यांपासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते.
इस्लामिक स्टेटसाठी काम करत असल्याचं समोर
दोन कॉन्स्टेबल्सनी मोहम्मद युनुस खान आणि मोहम्मद युसुफ यांना हटकले असता त्यांनी त्यांची खोटी नावे सांगितली. मात्र पोलीस कॉन्स्टेबल्सनी ट्रु कॉलरच्या सहाय्याने फोन लावून पाहिला असता त्यांची वेगळीच नावे फोनवर दिसून आली. त्यानंतर पोलीसांनी ते दोघे राहत असलेल्या कोंढव्यातील घरी जाऊन तपास केला असता इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी ते काम करत असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्याकडे महत्त्वाचे नकाशे आणि इतर साहित्य आढळून आलं. हे दोघेही बनावट नावाने गेल्या दीड वर्षापासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते.