अमरनाथ यात्रेत वेगवेगळ्या कारणांमुळे 24 मृत्यू
यंदाच्या वर्षी (2023) अमरनाथ यात्रेत वेगवेगळ्या कारणांमुळे 24 मृत्यू झाले आहेत. यापैकी 5 मृत्यू हे मागील 36 तासांमध्ये झाले आहेत. प्रतिकूल हवामान, उंचावर राहण्यासाठी आवश्यक फिटनेसची कमतरता यामुळे तब्येत ढासळून अनेक मृत्यू झाले आहेत.हाती आलेल्या माहितीनुसार, नैसर्गिक कारणामुळे अमरनाथ यात्रेच्या मार्गावर एका डोंगरातून दगड खालच्या दिशेला रस्त्यावर आले. अचानक आलेल्या या संकटात स्वतःला कसे वाचवावे हे समजले नाही आणि महिलेचा मृत्यू झाला. महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात जम्मू-काश्मीर माउंटेन रेस्क्यू पोलीस टीमचे 2 सदस्य गंभीर जखमी झाले. जखमी पोलिसांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. महिला यात्रेकरूसह अमरनाथ यात्रेदरम्यान एकूण 24 जणांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला.
उंचावर प्रतिकूल वातावरणात फुफ्फुसांमध्ये पाणी निर्माण होणे, हृदयक्रिया बंद पडणे, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. मागील 36 तासांत जे 5 मृत्यू झाले त्यापैकी 4 पहलगाम मार्गावर तर 1 बालटाल मार्गावर झाला आहे. मृतांमध्ये 1 आयटीबीपी अधिकारी आहे. आतापर्यंत ज्यांचा मृत्यू झाला ते सर्व जण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा आणि गुजरात या 4 राज्यांशी संबंधित नागरिक आहेत.
अमरनाथ येथील शंकराची बर्फापासून तयार होणारी नैसर्गिक पिंड ही ज्या गुहेत आहे ते ठिकाण 3888 मीटर उंचीवर आहे. यात्रा मार्गातील उंचावर असलेल्या निवडक भागांमध्ये जंक फूड, मिठाई, कोल्डड्रिंक्स यांच्या निर्मिती, खरेदी-विक्री आणि सेवनाला बंदी आहे. निवडक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे. भाविकांची काळजी घेण्यासाठी ठिकठिकाणी वैद्यकीय मदत केंद्रांची व्यवस्था आहे. यंदाची अमरनाथ यात्रा 1 जुलै 2023 रोजी सुरू झाली. यात्रेचा समारोप 31 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. यात्रेकरूंनी तब्येतीची काळजी घ्यावी, फिटनेस जपावा आणि अमरनाथ यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.