मंत्रिमंडळ विस्तार हा विषय खूप पांचट झालाय, हा विषय संपला पाहिजे; शिवसेनेच्या आमदाराची प्रतिक्रिया
बुलढाणा : मागच्या वर्षभरापासून राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांची नाराजी पाहायला मिळत आहे. अशात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा विषय खूप पांचट झाला आहे. आता लवकर विस्तार झाला पाहिजे अन् हा विषय संपला पाहिजे, असं ते म्हणाले.
अजितदादांसोबत जे काही झालं ते सगळ्यांनी पाहिलं आहे. अजितदादा मुख्यमंत्री होत होते, मात्र त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. दिल्लीला खासदार म्हणून पाठवलं. त्यांना राज्यात ठेवायचं नव्हतं. अजितदादांचं प्रस्थ वाढत आहे, अशी शरद पवारसाहेबाना कुणकुण लागली. त्यामुळेच त्यांनी राजीनाम्याचा फंडा आणला, असं संजय गायकवाड म्हणाले.
शरद पवारांनी भावनिक करून सगळ्यांना सोबत घेतलं. नंतर सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेलची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. पण अजितदादांना काहीच दिलं नाही. अजितदादांनी अल्टिमेटम दिला होता. त्यानतंर त्यांनी हा वेगळा विचार केला, असं संजय गायकवाड म्हणाले.
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. पण या मंत्रिमंडळ विस्तारमध्ये आपण काही मागितलेलं नाही. मला काही घ्यायचं पण नाही. मंत्रिमंडळ विस्तार आता खूप पांचट विषय झाला आहे. लवकर विस्तार होऊन हा विषय संपला पाहिजे, असं माझं मत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.