शिंदे गटात येताच निलम गोऱ्हेंना मोठं गिफ्ट, भाजपने घेतला ‘हा’ निर्णय
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेृत्तात शिवसेना योग्य मार्गावर चालली आहे. महिला विकास आणि देशविकासाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय आपण घेतल्याचं निलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान निलम गोऱ्हेंच्या शिंदे गटातील प्रवेशाला काही अवधी उलटला नसतानाच भाजपकडून त्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे.
भारतातील विचारसरणीपैकी 1992 नंतर एनडीए आणि युपीए अशा आघाड्या झाल्या. 1998 म्हणजे आता पंचवीस वर्ष झाली. त्यावेळी राजकीय विश्वहातार्य असलेला पक्ष, मराठी, हिंदुत्व आणि महिला धोरण असलेल्या पक्षात 1998 साली हिंदुह्रदय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रवेश केल्याचे निलम गोऱ्हे यांनी सांगितले.
दुसरीकडे भाजपकडून निलम गोऱ्हे यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मागे घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत प्रविण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला. तर प्रसाद लाड यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आहे.
उपसभापती नीलम गोऱ्हे पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी विरोधीपक्ष नेते असताना केला होता. यानंतर त्यांनी निलम गोऱ्हे यांच्याविरोधात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र आता हा दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव मागे घ्यावा असा प्रस्ताव प्रविण दरेकर यांनी मांडला आहे.
शिवसेनेत आपल्याला खूप चांगलं काम करत आलं. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश दिला आहे, की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हा अधिकृत पक्ष आहे. केंद्रीय स्तरावर एनडीए आणि भाजपाच्या नेतृत्वाखाली अयोध्येत श्रीराम प्रभूंचं मंदिर, तलाकपीडित महिलांना न्याय, काश्मिरमध्ये तिरंगा ध्वज आणि समान नागरी कायद्याबाबत सकारात्म पावलं उचलली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा यांची सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती आहे. 1985 ला शाहाबानो खटल्यात न्यायालयाने शाहाबानोला पोटगी मिळावी असा निर्णय दिला होता. पण विरोध आणि दबावाला बळी पडून तत्कालीन सरकारने मुस्लिम महिला घटस्फोटाचा अधिकार संरक्षण कायदा 1986 संमत केला. त्यामुळे महिलांना दुजाभाव सहन करावा लागला. राष्ट्रीय स्तरावर ही भूमिका घेऊन शिवसेना काम करत आहे. शेतकरी, महिलांच्या प्रश्नावर काम करत आहेत. त्यामुळे मी शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थन करत आहे असं निलम गोऱ्हे यांनी सांगितलं. यावेळी सटर फटर लोकांमुळे पक्षात नाराज होण्याचं कारण नाही असं म्हणत नीलम गो-हेंनी सुषमा अंधारेंचं नाव न घेता टोला लगावलाय.
ठाकरे गटातून गळती सुरुच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटातून गळती सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच उपनेते शिशिर शिंदे आणि विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. आता विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्याकडे काही आमदारांनी तक्रार केल्यानंतर गोऱ्हेंचं नाराजीनाट्य सुरु झाल्याचे म्हटलं जातं. उपसभातपी असून देखील आमदारांना त्या बोलू देत नाही अशी तक्रार काही आमदारांनी केली होती.