यंदा बाप्पाचे आगमन १९ दिवसांनी लांबणार, अधिक मास यंदा श्रावण महिन्यात
रत्नागिरी : १९ वर्षांनंतर आलेल्या अधिक मासामुळे यंदा गणपती बाप्पाचे आगमन गतवर्षीपेक्षा १९ दिवसांनी लांबणार आहे. गेल्यावर्षी ३१ ऑगस्ट रोजी गणेशाचे आगमन झाले होते. यंदा १९ सप्टेंबर रोजी गणेशाचे आगमन होणार आहे.
दर तीन वर्षांनी अधिक मास येतो. यंदा हा मास श्रावण महिन्यात आला असून, १९ वर्षांनंतर हा योग आला आहे.
हिंदू पंचांगानुसार यंदा मराठी वर्ष १३ महिन्यांचे असणार आहे. यंदा श्रावण महिन्यात अधिक महिना आला आहे. त्यामुळे श्रावण महिना तब्बल ५९ दिवसांचा असणार आहे. त्यामुळे यावर्षी श्रावणाचे दोन महिने मानले जाणार आहेत. त्यामुळे यंदा श्रावणातील धार्मिक व शुभकार्ये श्रावणाच्या पहिल्या महिन्यात न होता, दुसऱ्या महिन्यात होणार आहेत.
यावर्षी मंगळवार, दि. १८ जुलैपासून अधिक मास सुरू होणार असून, तो १६ ऑगस्ट रोजी संपणार आहे. तर २६ ऑगस्ट रोजी अधिक मासाची सांगता होणार आहे. याचा परिणाम हिंदू सणांवरही होणार आहे. १५ जुलैला शिवरात्रीचा सण आल्याने त्याच्यावर या अधिक मासाचा परिणाम होणार नाही. मात्र, शिवरात्रीनंतर १५ दिवसांनी येणारा रक्षाबंधनाचा सण अधिक मास आल्याने ४६ दिवसांनंतर म्हणजेच ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. याचबरोबर गणेशाचे आगमनही लांबणार आहे.
मात्र, यंदा श्रावणात आलेल्या अधिक मासामुळे विघ्नहर्त्याचेही आगमन लांबले असून, भक्तांना तब्बल १९ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. यंदा १९ रोजी गणेश चतुर्थी आली आहे. तर पाचव्या दिवशी म्हणजे २३ रोजी गाैरी-गणपतींचे विसर्जन होणार आहे. तर दहा दिवसांच्या बाप्पांना २८ सप्टेंबर रोजी निरोप दिला जाणार आहे.