अजित पवारांमुळे महापालिकेत भाजपची ताकद वाढणार
पिपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या किल्ल्यास सुरुंग लावत भाजपने सन 2017 ला सत्ता काबीज केली. राष्ट्रवादी काँग्रेसवर भ-ष्टाचाराचे आरोप करीत भाजपने त्यांना पायउतार केले.
त्याच पक्षासोबत युती करून आगामी महापालिका निवडणूक लढवली जाणार असे, चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्यांना धक्का बसला असून, त्यांच्या राजकीय अस्तित्वाला वेसण बसणार आहे; मात्र पक्षाची ताकद वाढणार असल्याने अजित पवारांच्या आगमनाचे शहर भाजपकडून स्वागत केले जात आहे. तर, संपूर्ण चित्र अद्याप स्पष्ट न झाल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी संभ-मावस्थेत आहेत.
महापालिकेतील मागील पंचवार्षिकेत 128 पैकी सत्ताधारी भाजपचे 77 नगरसेवक होते. राष्ट्रवादीचे 36, शिवसेनेचे 9, मनसे 1 आणि अपक्ष 5 नगरसेवक होते. मागील निवडणुकीत भाजपसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले-आरपीआय) हा पक्ष होता. आता विरोधातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे सर्व राजकीय गणिते बदलली आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी व आरपीआय अशी नवी युती साकारली आहे. त्याचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकीत दिसणार हे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेत सत्ताधारी भाजप विरोधात राष्ट्रवादी हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. नगरसेवकांची एक आकडी संख्या लक्षात घेता शिवसेना (ठाकरे गट) व मनसेचा विरोध दखल घेण्याइतपत प्रभावी नाही. काँग्रेसचा तर एकही नगरसेवक नव्हता. कट्टर विरोधक मित्र झाल्याने आणि राष्ट्रवादी सत्ताधार्यांसोबत सामील झाल्याने पालिकेत भाजपला सत्ता काबीज करणे सहजसाध्य होणार आहे. मागील आकडेवारीनुसार भाजप 77, राष्ट्रवादी 36 आणि अपक्ष 4 असे 117 नगरसेवक अशी या नव्या युतीचे गोळाबेरीज असेल. या बाहुबली नगरसेवक संख्येवर भाजप पालिकेचा कारभार जोमाने हाकू शकते. परिणामी, विरोधकांचे शिल्लक असलेले अस्तित्वच धोक्यात
येऊ शकते.
अजित पवारांशिवाय पिंपरी-चिंचवडचे पान हलणार नाही
पिंपरी-चिंचवड व पुणे शहरावर अजित पवार यांचे पूर्वीपासूनच बारीक लक्ष आहे. पिंपरी-चिंचवड शहरावर त्यांची पकड आताही कायम आहे. शहरातील संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या ताब्यात आहे. बहुतांश पदाधिकारी त्यांच्या आदेशानुसार काम करतात. नव्या राजकीय समीकरणामुळे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये जाऊन वेगळे अस्तित्व निर्माण केलेल्या नेतेमंडळी व पदाधिकार्यांची गोची होवू शकते. पवारांच्या पिंपरी-चिंचवड प्रेमामुळे भाजपच्या नेतेमंडळीच्या कक्षा मर्यादित होतील. पवारांच्या मंजुरीशिवाय पालिकेत म्हणजे पर्यायाने शहरात कारभार करणे अशक्य ठरेल. एकप्रकारे पवारांमुळे त्यांना वेसण बसू शकते. त्यांच्या मर्जीशिवाय काही करता येणार नाही.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय नवी युती
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपसोबत शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय अशी नवी युती दिसणार आहे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक संख्याबळ अधिक वाढणार आहे. परिणामी, विरोधक अधिक कमकुवत होण्याची शक्यता आहे. विरोधकांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी झगडावे लागणार आहे.
भाजप खूष, तर राष्ट्रवादी शॉकमध्ये
राज्यातील सत्तेत सोबत अजित पवार आल्याने स्थानिक भाजपकडून स्वागत केले जात आहे. तर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी संभ-मावस्थेत आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा मोबाईल रविवारी (दि. 2) दिवसभर स्वीच ऑफ होता. संपूर्ण चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे 6 जुलैला सभा घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत. संपूर्ण पक्ष अजित पवारांसोबत आहे की काही आमदार सोबत आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्यांकडून सावध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पहाटेच्या शपथविधीप्रमाणे ही गुगली तर नाही ना, नवा संसार किती दिवस चालणार, ही युती मतदार स्वीकारणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.