सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटायला नको : राज ठाकरे
राष्ट्रवादीतील फूटीसंदर्भात मला काहीच माहिती नाही, असे शरद पवार म्हणत असले तरी ते पटणारे नाही. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या परवानगीशिवाय शपथ घेतील का, असा सवाल करत उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटायला नको, अशी खोचक टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ( दि.3 ) केली.
माध्यमांशी बाेलताना राज ठाकरे म्हणाले की, पहाटेचा शपथविधी झाल्यापासून हे सर्व सुरू झाले. या नंतर महाविकास आघाडी अस्तीत्वात आली. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. या नेत्यांना मतदारांशी काही देणघेण नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी हे काहीही करतील. यामुळे राज्याचे राजकारण गलिच्छ होत चाललं असून, राज्यातील मतदारांनी या गोष्टींचा विचार करायला हवा असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. मी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असून, या सगळ्यावर मी माझी भूमिका लवकरच मांडणार असल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.