ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचं नाव., रवी राणांचे राऊतांना प्रत्युत्तर
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. सिंदखेड राजाजवळ बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. यानंतर काही क्षणातच या बसने पेट घेतला या अपघातात आतापर्यंत 26 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 3 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेवर भाष्य करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात, असे म्हटले आहे. ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे, असं म्हणत आमदार रवी राणा यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
या अपघातानंतर रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. समृद्धी महामार्ग हा मुंबईपासून विदर्भाला जोडणारा मार्ग आहे. टेक्निकल टीमने बसून यावर अभ्यास केला पाहिजे. संजय राऊत ज्या मार्गाला शापित म्हणतात, त्या मार्गाचं नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. त्याला शापित म्हणणं हे चुकीचे आहे, असं रवी राण म्हणाले.
रवी राणा यांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांनीही संजय राऊतांच्या विधानावर पलटवार केला आहे. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसाठी शापित आहेत. या अपघातावर राजकारण करू नये. तसेच, राजकारण करणाऱ्याचे दु:ख वाटते, तर संजय राऊत यांच्या बातम्या माध्यमांनी दाखवू नये. वारंवार होत असलेल्या अपघातावर तज्ज्ञ लोकांनी अभ्यास करावा, असं नवनीत राणा म्हणाल्या.
काय म्हणाले संजय राऊत?
गेल्या वर्षभरामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. आजच्या अपघातात 25 लोक ज्या पद्धतीने तिथे मरण पावले हे दुर्देवी आहे. समुद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झालेला आहे. तो शापित का झाला त्याच्या खोलात जावं लागेल. ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने मनमानी केली. अनेक गोष्टी आहेत, त्या भविष्यात पुढे येतील, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले.
ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने मनमानी केली. अनेक गोष्टी आहेत, त्या भविष्यात पुढे येतील. पण दुर्देवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, वारंवार मृत्यू होत आहेत, हे काही चांगलं नाही. किती वेळा श्रद्धांजली वाहायची. शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने हडप करण्यात आल्या आहेत. त्या शेतकऱ्यांच्या शापामुळेच या महामार्गावर अपघात होत असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली.