देशी गाय खरेदी करा, ४० हजारांचे अनुदान घ्या; या राज्याने सुरू केली नंद बाबा मीशन योजना
लखनौ : उत्तर प्रदेशात पशुपालनाशी संबंधित शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नंद बाबा मीशन सुरू करत आहे.या मीशन अंतर्गत गोपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाय खरेदी केल्यास अनुदान मिळणार आहे. राज्य सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हे मीशन सुरू केले आहे. यामुळे उत्तर प्रदेशात दुधाचे उत्पादन वाढेल. अशी योजना महाराष्ट्रात का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बिहार सरकार भाजीपाला आणि फळबाग लागवडीवर मोठ्या प्रमाणात अनुदान देते. महाराष्ट्र राज्य सरकारही फळबाग लागवडीसाठी अनुदान देते. पण, भंडारा जिल्ह्यातील एकोडी येथील डोंगरवार या कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना धमकी देऊन फळबाग योजनेचा लाभ कसा मिळतो, हे पाहून घेईन, अशी धमकी दिली. असे कृषी सहाय्यक असतील तर गावांचा विकास कसा होईल, असा सवाल निर्माण होतो.
नंद बाबा मीशनची सुरुवात देशी गायींची संख्या वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांनी जास्त दूध देणाऱ्या देशी गायी खरेदी केल्यास अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे राज्यात देशी गायींची संख्या वाढेल. लोकांना पशुपालनातून फायदा होईल. रस्त्यावर बेवारस फिरणाऱ्या पशुंची संख्या कमी होईल. लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची कमाई वाढेल.
गायीच्या विम्याचा खर्च योगी सरकार करणार
विशेष बाब म्हणजे नंद बाबा मीशन अंतर्गत शेतकरी साहिवाल, थारपारकर आणि गीर जातीच्या गायी खरेदी करू शकतात. अशी गाय खरेदी केल्यास राज्य सरकार शेतकऱ्यांना ४० हजार रुपये अनुदान देणार आहे. या तिन्ही प्रकारच्या गायी या पंजाब, राजस्थान आणि गुजरात राज्यातील आहेत.
या राज्यांतून गायी खरेदी केल्यास वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. अशावेळी वाहतूक करताना गायीला काही झाल्यास त्याचा विम्याचा खर्चही योगी सरकार उचलणार आहे.
अशी मदत दिली जाणार?
जास्त दूध देणारी देशी जातीची गाय खरेदी केल्यास हे अनुदान दिले जाईल. नंद बाबा मीशनचे प्रमुख शशी भूषणलाल सुशील यांना असे वाटते की, यामुळे राज्यातील दुधाचे उत्पादन वाढेल. गायीच्या एकूण किमतीच्या ४० टक्के किंवा अधिकाअधिक ४० हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. गायीचा तीन वर्षांसाठी विमा योगी सरकार काढणार आहे.