नगरचे जिल्हाधिकारी आणि सोलापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने वाचले वारकऱ्याचे प्राण
नगर:नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या प्रसंगावधानाने वारीतील एका वारकऱ्याचे प्राण वाचले आहेत.
आषाढी वारीची लगबग सुरू असून अनेक पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. शनिवार 24 जून रोजी रात्री नगर जिल्ह्यातील भातोडे येथे राहणारे वारकरी सुभाष काशिनाथ पवार यांना रात्री अडीच वाजता करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी जवळ मायनर अटॅक आला. त्यावेळी सोबत असलेले वारकरी शामराव घोलप यांनी तात्काळ नगरचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना फोन करून माहिती दिली.
सालीमठ यांनी तात्काळ जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना याबाबत कल्पना दिली. एवढ्या रात्री कुणाला संपर्क करायचा असा विचार करत त्यांनी लगेच करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक संजय आंबोले यांना फोन करून पवार यांना तात्काळ सेवा मिळवून देण्याबाबत सूचित केले. अंबोले यांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून पवार यांना मायनर अटॅक असल्याने आणि पीएसी जेऊर येथे तज्ञ डॉक्टर नसल्याने करमाळ्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. कोळेकर यांच्याकडून करमाळ्याचे कार्डियाक डॉ. जावळेकर यांना सूचित करून पवार यांना तातडीने उपचाराबाबत विनंती केली.
डॉ. जावळेकर यांनी प्रसंगाचे भान ओळखून पवार यांना तात्काळ उपचार केले. वेळीच उपचार मिळाल्याने पवार ठणठणीत बरे झाले असून रविवारी सकाळी वारीत सामील झाले असल्याचे समजले.