. म्हणून मला विरोधी पक्षनेते पद नकोय!
अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पद का नकोय याचा खुलासा स्वतः त्यांनीच आज केला. आतापर्यंत सरकारमध्ये अनेक पदे भूषवली. त्यामुळे आता पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यात वाईट काय?असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
आपल्याला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून संघटनेत कोणतेही पद द्या अशी विनंती अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळय़ात केली होती. त्यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार हेसुद्धा उपस्थित होते. अजित पवार यांना इतके महत्त्वाचे पद मिळूनही ते का नकोय असा प्रश्न तेव्हापासून अनेकांना पडला होता. आज माध्यमांनी त्यांना याबाबत विचारले. मुख्यमंत्र्यानंतरचे सर्वात ताकदीचे विरोधी पक्षनेते पद सोडून तुम्ही पक्ष संघटनेत जाताय याबद्दल माध्यमांनी आश्चर्य व्यक्त करताच अजित पवार म्हणाले की, ‘पक्ष संघटनेत काम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 32 वर्षांत आपण आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता अशी विविध पदे भूषवली. आता पक्षासाठी काम करायचे आहे.’