‘सुपर’मध्ये २२ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
अमरावती : स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे २२ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शनिवारी यशस्वी झाली. यवतमाळच्या एका ३१ वर्षीय युवकाला ५१ वर्षीय आईने आपली किडनी दान करून नवे जीवनदान दिले आहे. दोन्ही किडनी निकामी झाल्याने चेतन सुरेश राठोड हा युवक मागील सहा महिन्यांपासून त्रस्त होता. त्याच्यावर डायलिसिस सुरू होते. आपल्या मुलाला होणाऱ्या असह्य वेदना पाहून आईचे काळीज रोज पाझरत होते. अशा परिस्थितीत आपल्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी अखेर आई उषा राठोड यांनी आपल्या मुलाला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
सुपर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी, डॉ. प्रणीत काकडे, युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. प्रतीक चिरडे, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. पूर्णिमा वानखडे, डॉ. रोहित हातगावकर, डॉ. जफर अब्बास अली, डॉ. अंजू दामोदर, डॉ. सुनीता हिवसे यांनी केली. किडनी ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर डॉ. सोनाली चौधरी, समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे समाजसेवा अधीक्षक यांनी मोफत शस्त्रक्रियेसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार केली.