रोहिणी पाठोपाठ मृग कोरडे ! मुगाचा पेर वाया जाणार, पेरणी लांबणीवर
अहमदनगर: पारनेर तालुक्याच्या पट्ट्यात रोहिणी नक्षत्रा पाठोपाठ मृग ही कोरडे चालले असून, मूगाची पेर टळून गेली
शेतकर्यांनी वाटाण्यासह राजमा बियाण्याची मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे, तर कांदा मोठ्या प्रमाणात साठवणूक केला असून, चांगला पाऊस झाल्यास परत शेतकरी कांदा पिकाकडे वळतील.
गेल्या पाच ते सहा वर्षांच्या काळात पारनेरसह परिसरात रोहिणी नक्षत्राने पूर्णपणे पाठ फिरविली होती; मात्र गेल्या वर्षात रोहिणीसह मृगच्या सरी चांगल्या बरसल्याने शेतकर्यांनी कोट्यावधी रुपयांचे वाटाणा, मूगासह राजमाची पेरणी केली होती. मातीमोल भावात विकत असलेला कांदा,त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, पावसाने दिलासा दिला तर परत छोटमोठे कर्ज घेवून शेतकरी तयारीला लागला आहे. परिसरात वाटाणा, मूगासह राजमाचे बियाणे शेतकर्यांनी घेतले असून, आता मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे.
बळीराजाबरोबर व्यापारीही चिंतातूर
पठार भागात वाटाणाचे मोठ्या प्रमाणावर पेरणी होत असते; मात्र यंदा रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडा चालला असून, पाऊसाने दडी मारल्यास पिंपळगाव रोठा, गारगुंडी, भोंद्रे, निवडुंगेवाडी, कासारे, वडगाव दर्यासह पठार भागात वाटाण्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. वाटाणा खालोखाल सोयाबीन, कांदा बियाण्याला चांगली मागणी राहत असून, येत्या चार – आठ दिवसांत पाऊस झाला तरच मूग, सोयाबीन, कांदा, वाटाणाची पेरणी होईल. अन्यथा शेतकर्यांपाठोपाठ व्यापारीही अडचणीत सापडतील, असे टाकळी ढोकेश्वरचे प्रतिष्ठीत व्यापारी विलास कटारिया व अविनाथ पायमोडे यांनी सांगितले.