देशात भाजपविरोधी लाट; शरद पवारांचं महत्त्वाचं विधान
कर्नाटकातील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लक्षात घेता सध्या ‘भाजपविरोधी लाट’ असून देशातील जनतेला बदल हवा आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. लोकांची हीच मानसिकता कायम राहिल्यास आगामी निवडणुकीत देशाला बदल पाहायला मिळेल, असे शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्रातील छोट्या-छोट्या घटनांना ‘धार्मिक रंग’ दिला जात आहे, हे चांगले लक्षण नाही, असा दावाही त्यांनी केला.
कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पराभवाचा सामना करावा लागला, जिथे काँग्रेस पाच वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा सत्तेवर आली.
2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि लवकरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
शरद पवार म्हणाले, ‘परिस्थिती पाहता, मला वाटतं, भाजपविरोधी लाट उसळली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा विचार करता, लोक बदलाच्या मूडमध्ये आहेत. लोकांची हीच मानसिकता कायम राहिली, तर आगामी निवडणुकीत देशात निश्चित बदल होईल, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही’.
लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले की, ‘मला तसे वाटत नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लक्षात घेता, मला वाटत नाही की केंद्रातील राज्यकर्ते लोकसभा निवडणुकीसह राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याच्या भानगडीत पडतील. ते फक्त लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करतील’.