नमो आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्यांसाठी १० लाख घरे बांधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : मागासवर्गीय तसेच सर्वसामान्य नागरिकांना घरे उपलब्ध व्हावी यासाठी राज्यात नमो आवास योजना सुरू करणार असून, त्याअंतर्गत १० लाख घरे बांधण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा शहरात विविध प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमीपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सर्व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शिंदे बोलत होते.
केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना आहे. त्याप्रमाणे राज्यातील मागासवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी नमो आवास योजना सुरू करणार असून त्याअंतर्गत १० लाख घरे बांधण्यात येणार असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच दिव्यातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसणार असून दिव्याच्या विकासासाठी येत्या काही काळात आणखी निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही शिंदे म्हणाले. दिव्यातील स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. दिवा शहराने मला दिलेला शब्द पाळला. मीही निधीसाठी कुठेही कमी पडू दिले नाही. आज ६१० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. आणखी मागण्याही करण्यात आल्या आहेत. त्यालाही निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बुलेट ट्रेनच्या गतीप्रमाणे राज्याचा विकास होत असल्याचेही शिंदे म्हणाले. रक्ताचा प्रत्येक थेंब महाराष्ट्राच्या सेवेसाठी खर्च करणार असल्याचेही शिंदे म्हणाले. दिवा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिलाच दौरा होता. आगरी कोळी आणि वारकरी भवनाच्या भुमीपूजनानंतर एकनाथ शिंदे हे धर्मवीर नगर येथे सभास्थानी जात होते. परंतु शिंदे यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तीन किलोमीटर रांगा लागल्याचे चित्र होते. पंढरपूर देवस्थानातील अंतर्गत कामे, सुशोभिकरण, मजबुतीकरण, भक्तांच्या सोयीसाठी यासाठी मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंडळाच्या सहकार्याने ८३ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देऊन निधी वर्ग केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.