दीड रुपये किलोचा कांदा तेलंगणात १८ रुपयांनी विकणार, बीआरएसचा पुढाकार..
तेलंगणातील भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाने शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर लक्ष घातले आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी कमी भावामुळे हवालदिल झाला आहे. दीड ते तीन रुपये किलो एवढ्या कवडीमोल भावाने कांद्याची खरेदी सुरू आहे. त्यामुळे कांदा रस्त्यावर फेकला जातोय, पुरून टाकला जातोय. अब की बार किसान सरकार हे ब्रीद घेऊन नांदेड मार्गे महाराष्ट्रात सक्रीय होवू पाहणाऱ्या बीआरएसने या प्रश्नी लक्ष घातले आहे. माजी आमदार व बीआरएसचे सक्रीय सदस्य हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड-सोयगांव मतदारसंघातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी त्यांचा कांदा तेलंगणात नेवून विकण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
तेलंगणा मार्केट कमिटीमध्ये महाराष्ट्रात दीड ते तीन रुपये किलो विकला जाणारा कांदा तिकडे १८ रुपये दराने खरेदी केला जाणार असल्याची माहिती हर्षवर्धन जाधव यांनी दिली. हा कांदा तेलंगणात नेण्यासाठीची व्यवस्था बीआरएसकडून केली जाणार आहे, कांद्यासाठी बारदाना पोते प्रत्येकी ३५ रुपयांना मिळते ते देखील मोफत दिले जाणार असून तेलंगणात कांदा घेवून जाणाऱ्या उत्पादक शेतकऱ्याला हमाली देखील द्यावी लागणार नसल्याचे जाधव यांनी सांगितले.