लाखांची घरफोडी, दोन तासांत अट्टल घरफोड्या जेरबंद; सोन्याचे दागिने, रोख रक्कम हस्तगत
अकोला : आपातापा रोडवरील जगजीवनराम नगरातील दुबेवाडीत संतोष देवकर यांच्या घरी सोमवारी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज चोरून नेला होता.सिव्हिल लाइनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी तातडीने तपास करून, यातील अट्टल घरफोड्यास दोन तासांमध्ये जेरबंद करून, सोन्याचे दागिने, रोख रकमेसह दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
आकाश संजय देवकर (वय ३२) यांच्या तक्रारीनुसार, ५ जून रोजी पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास कपाटातील १७ ग्रॅमच्या चार अंगठ्या, एक ग्रॅमचे सोन्याचे दोन लॉकेट, दोन ग्रॅमची नथ, ७० ग्रॅमचे चांदीचे दोन ब्रेसलेट, चांदीच्या दोन चेनपट्ट्या, रोख २१ हजार ८०० रुपये व मोबाइल असा एकूण एक लाख ४७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलिसांनी दोन तासांत घरफोडीचा छडा लावून अट्टल घरफोड्या दिनेश भारसाकळे (रा.निंबी चेलका, ता.बार्शीटाकळी) याला अटक केली. त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. दिनेश भारसाकळे हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर १० ते १५ गुन्हे विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्याची कारागृहातून सुटका झाली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद
चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास चोरटा गेटवरून घरात घुसला व त्याने ऐवज चोरून पलायन केल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळून आले. चोरलेल्या मोबाइलनेच केला घात
चोरीची घटना झाल्याची तक्रार दाखल होताच, सायबर पोलिसांच्या मदतीने घरफोड्याने चोरलेल्या मोबाइलचे लोकेशन काढले. डॉग स्क्वॉडचीही मदत घेण्यात आली. घरफोड्याचे शेवटचे लोकेशन आपातापा रोडवर दिसत असल्याने, पोलिसांनी त्याचा माग काढला. एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. त्यास पोलिसांनी हटकले असता, त्याने पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.