शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कराडात निघाली ‘शिवराज्य बाईक रॅली
शिवरायांचा अखंड जयघोष, मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कराड तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कराड भाजपच्या वतीने शिवतीर्थ (दत्त चौक कराड) ते सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचे स्मृतीस्थळ अशी ‘शिवराज्य बाईक रॅली’ काढण्यात आली. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कराडच्या दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला डॉ. भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन शिवराज्य बाईक रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. तेथून पुढे ही रॅली शाहू चौक, जुना कोयना पूल, वारुंजी फाटा, राष्ट्रीय महामार्गावरुन तळबीड येथे पोहचली. छत्रपती शिवरायांचा अखंड जयघोष करत निघालेल्या या रॅलीत युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी डॉ. अतुल भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करत रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची घटना ही एका नव्या युगाची नांदी होती. आपल्या राज्यातील रयत सुखी, समाधानी व्हावी यासाठी छत्रपती शिवरायांनी केलेले कार्य अभूतपूर्व असे आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाच्या सुशोभिकरणासाठी आणि एकूणच तळबीड गावच्या विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.
तळबीड येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करुन मानवंदना देण्यात आली. यानंतर जखिणवाडी (ता. कराड) येथील विद्यार्थी-युवकांनी शिवकालीन मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी तळबीडच्या सरपंच मृणाल उमेश मोहिते, उपसरपंच वैशाली पाटील, भाजपा कराड दक्षिण तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक सुहास जगताप, राजू मुल्ला, कृष्णा कारखान्याचे संचालक सयाजी यादव, उमेश मोहिते, मोहनराव जाधव, सुहास कदम, दादासो मोहिते, अनिल वाघमारे, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक नारायण शिंगाडे, प्रमोद पाटील, सूरज शेवाळे, रमेश मोहिते, संतोष हिंगसे यांच्यासह युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.