पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग: महामार्गाचा सविस्तर आराखडा तयार कण्यासाठी एमएसआरडीसीकडून सल्लगाराची नियुक्ती
मुंबई : पुणे ते नाशिक अंतर केवळ दोन तासात पार करता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. १८०किमी लांबीच्या या महामार्गाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी तसेच जागेचा शोध घेण्यासाठी एमएसआरडीसीकडून आता सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या सल्लागाराच्या माध्यमातून येत्या वर्षभरात जागा निश्चित करण्यासह आराखडा पूर्ण करण्यात येणार आहे.
राज्यभरातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी एमएसआरडीसीने ४२१७ किमीचे महामार्गाचे जाळे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यातीलच एक महामार्ग म्हणजे पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग. अंदाजे २० हजार कोटी रुपये इतका अपेक्षित खर्च असलेल्या या १८० किमीच्या महामार्गामुळे पुणे ते नाशिक अंतर केवळ दोन तासात पार करता येणार आहे. पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासाला चालना मिळावी या उद्देशाने हा महामार्ग हाती घेण्यात आला आहे. महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता एमएसआरडीसीने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या महामार्गाचा आराखडा तयार करण्यासाठी तसेच महामार्गासाठी जागेचा शोध घेण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याकरीता काही महिन्यांपूर्वी निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार नुकतीच निविदा अंतिम करण्यात आली असून सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. मोनार्च सर्व्हेअर अँड इंजिनियरिंग कन्सल्टंट या कंपनीची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. आता ही सल्लगार कंपनी पुढील नऊ ते बारा महिन्यात जागेचा शोध घेण्यासह आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण करेल. त्यानंतर महामार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी या महामार्गाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.