जलशक्ती अभियान अंतर्गतच्या कामांची केंद्रीय पथकाकडून पहाणी
जलशक्ती अभियान ‘कॅच द रेन’ या अभियानांतर्गत पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करण्याचे व प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्यासाठी विविध उपाययोजना जिल्ह्यात विविध विभागांद्वारे हाती घेण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने केंद्र शासनाचे उर्जा मंत्रालयाचे सह सचिव पियुष सिंग व केरळ येथील केंद्रीय भूमीजल मंडळाच्या श्रीमती अनु वेंकटीरमण यानी पुणे जिल्ह्यातील पुनर्भरण कामांची पाहणी केली.
क्षेत्रीय पाहणीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, भूजल सर्वेक्षण विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. गावडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव बोरकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, गटविकास अधिकारी अनिता पवार, तालुकास्तरीय अधिकारी तसेच उदाचीवाडी व पिसर्वे ग्रामपंचायतचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. पुरंदर तालुक्यामधील सासवड नगरपरिषद येथील पुनर्भरण कामाचे, मौजे उदाचीवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाणीपुरवठा विहिरीचे तसेच पाणीपुरवठा विहिरीलगत अटल भूजल योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या रिचार्ज शाफ्ट कामांची पाहणी केली. मौजे पिसर्वे येथे अमृत सरोवर योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या पाझर तलावाच्या कामाची पाहणी केली. पाहणी दरम्यान कामाच्या प्रगतीबाबत तसेच असलेल्या लोकसहभागा बाबत श्री. सिंग यांनी विशेष कौतुक केले व पुढील कामे अभियान कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी कामांच्या प्रगतीबाबत माहिती दिली.