वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, सहा जनावरे दगावली
मराठवाड्याच्या विविध भागात रविवारी (ता. ४) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू तर सहा जनावरे दगावली आहेत. छत्रपती संभाजीनगरसह सोयगाव, वैजापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, खुलताबाद, गंगापूरमध्ये वाऱ्याचा तडका बसला. अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली. वीज खांब कोसळले. काही ठिकाणी विवाह समारंभात वऱ्हाडी मंडळींची तारांबळ उडाली.
लिंबे जळगाव जवळील तुर्काबाद खराडी येथे काका पुतण्यावर वीज पडली. यात शेतकरी चुलत्याच्या जागीच मृत्यू तर पुतण्या गंभीर जखमी झाला. कृष्णा रामदास मेटे असे मृताचे नाव आहे निलेश मेटे असे जखमी पुतण्याचे नाव आहे. बीड जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह वीज पडण्याच्या घटना घडल्या. वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भारत गणपती मुंडे राहणार आंबलटेक ता अंबाजोगाई असे त्याचे नाव आहे.जिल्ह्यात तीन जनावरे दगावली. आष्टी तालुक्यात वादळामुळे काही घरावरील पत्रे उडाली. आष्टी तालुक्यातील खानापूर येथे घराची छत कोसळून प्रभाकर दिगंबर तावरे, चेतन ज्ञानदेव तावरे, व सौरभ दिगंबर तावरे हे जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. खुंटेफळ येथे कोंबड्याचे शेड कोसळून नुकसान झाले. पिंपळगाव घाट येथील राजमाता आश्रम शाळेचे छतावरील पत्रे उडाली. कल्याण विशाखापटनम महामार्गावरील बडेवाडी येथील टोलनाक्याचे शेड जोराचा आवाज करत कोसळले.
लातूर जिल्ह्यातील सोनकाळा (ता. जळकोट) येथे वीज पडून म्हैस दगावली. त्यामुळे नागनाथ कोंडीबाम मुसळे यांचे सुमारे ७० हजाराचे नुकसान झाले. अहमदपूर तालुक्यातील खानापूर, गुंजोटी, मोहगाव परिसरात जोरदार वारा मेघर्जीने तुरळक पाऊस झाला. खानापूर येथील सखाराम पंढरी शिंदे यांच्या मालकीची ९० हजार रुपये किमतीची, महेश राहुल पांडुरंग सुरकुटे यांच्या मालकीची साठ हजार रुपये किमतीचा बैल वीज पडून दगावला.
जालना जिल्ह्यातील भोकरदन, परतुर, घनसावंगी, मंठा, अंबड शहरासह तालुक्याचे विविध भागात वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पेंडगाव येथे चक्री वादळात शॉर्टसर्किटने आगीचे ठिणगी पडल्याने सहा शेतकऱ्यांचे अकरा लाखाचे नुकसान झाल्याचा महसूल विभागाने पंचनामा केला. अंधारी शिवारात वादळी वाऱ्याने राहते घरावरील पत्रे उडाली ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. कुंभेफळ शिवारात चक्रीवादळावेळी बाजूच्या विद्युत तारातून निर्माण झालेल्या घर्षणाने कडबा गंजी, भुसा व शेणखत जळून सुमारे लाख रुपयांचे अंदाजे नुकसान झाले. फर्दापुरसह परिसरात झालेल्या चक्रीवादळाचा तडाख्यात व विजांच्या कडकडाटामध्ये धनवट शिवारात धनवट येथील सबिरखा मुनीरखा पठाण यांच्या घराजवळील गोठ्याजवळ रोहित्रावर वीज कोसळून विजेच्या धक्क्याने एक बैल मृत झाला.