मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुलोचना दिदींचं घेतलं अंत्यदर्शन, शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
सुलोचना दीदी यांनी 250 हून अधिक मराठी चित्रपटातून काम केलं. प्रमुख भूमिकेसह सहाय्यक अभिनेत्री म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. सुलोचना दीदींनी 40 च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं होतं. मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत अभिनेत्री सुलोचना दिदी यांच्या प्रभादेवी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी सुलोचना दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दिदींच्या कुटूंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. आज शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीमध्ये सुलोचना दिदी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
वयाच्या 94 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
वयाच्या 94 व्या वर्षी सुलोचना दीदींनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी दीदींची तब्येत ढासळली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. याआधी मार्च महिन्यातही त्यांची प्रकृती बिघडलेली होती. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती.
सुलोचना दीदी यांनी 250 हून अधिक मराठी चित्रपटातून काम केलं. प्रमुख भूमिकेसह सहाय्यक अभिनेत्री म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. सुलोचना दीदींनी 40 च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं होतं. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही काम केलं.अमिताभ बच्चन, धर्मेंद्र ते शशी कपूर यांची पडद्यावरची आई हरपली. घरंदाज अभिनय, सोज्वळतेचा चेहरा आणि मराठी मातीतील शालीनता म्हणजेच सुलोचना दीदी होत्या. त्यांचं मूळ नाव सुलोचना लाटकर. कोल्हापूरमधल्या खडकलाट गावी सुलोचना दीदींचा जन्म झाला. 250 हून अधिक मराठी आणि 150 हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. तंबुतल्या चित्रपटाने सुलोचना दीदींना चित्रपटांची ओढ निर्माण केली. पण गुरु भालजी पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं खरं शिक्षण झालं.