पुण्यात बैलगाडा शर्यतीवेळी दुर्घटना; घटनेत एकाचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी
पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरातील रामदऱ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी बांधण्यात आलेला स्टेज कोसळून एकाचा मृत्यु झाल्याची घटना काल (रविवारी) सायंकाळी घडली आहे. तर या दुर्घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
बाळासाहेब काशीनाथ कोळी (वय ४६, रा. निनाम पाडळी, जि. सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर या दुर्घटनेत शुभम विजय लोखंडे (वय २४), मयूर प्रमोद लोखंडे (वय २५), विकास वाल्मिक ढमाळे (वय २४, रा. पिंपरी वळण, ता. राहुरी, जि. अहमदनगर) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली आहे.याघटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याजवळील वडकी येथील बैलगाडा शर्यतीचे आयोजन शिवसेनेच्यावतीने करण्यात आलं होतं. काल सायंकाळी या शर्यतीवेळी चेंगराचेंगरीची घटना घडली. बसण्यासाठी लावण्यात आलेले बेंच कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
या कार्यक्रमादरम्यान सोसाट्याच्या वारा सुटला त्यामुळे स्टेज कोसळला आणि आडोशाला थांबलेले कोळी, लोखंडे, ढमाळे यांच्या अंगावर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्टेज कोसळल्यानंतर परिसरात धावपळ उडाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब कोळी यांच्यासह शुभम लोखंडे, मयूर लोखंडे, विकास ढमाळे यांना त्वरीत हडपसर भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांपूर्वीच बाळासाहेब कोळी यांचा मृत्यू झाला.