ताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरील अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने तात्काळ सुरक्षितता उपाययोजना करण्याची गरज


मुंबई:”नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा – सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे.
समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेत जखमी प्रवाश्यांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज समृध्दी महामार्गावर झालेल्या बस अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.



विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या शोकसंदेशात पुढे म्हणतात की, समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्यावतीने सातत्याने करण्यात आली आहे. शासनाने आतातरी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button