तरुणाकडून गुंगीकारक औषधांचा साठा पकडला, २९ हजारांचा मुद्देमाल जप्त

धुळे : शहरातील शब्बीर नगर, २ हजार वस्ती परिसरात एका तरुणाकडून २८ हजार ३०० रुपयांचा गुंगीकारक औषधांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास झाली. अकबर अली ऊर्फ अकबर जलेल्या कैसर अली शेख (वय ३४) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.
शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला. चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे कर्मचारी पंकज ज्ञानोबा शिंदे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शहरातील २ हजार वस्ती, शब्बीर नगर भागात एक तरुण काहीतरी गुंगीकारक औषधांचा साठा बाळगून असून तो कोणालातरी विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहे, अशी गोपनीय माहिती चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांना मिळाली. माहिती मिळताच शब्बीर नगर भागात पोलिसांच्या पथकाने सापळा लावला.
यात सापळ्यात अकबर अली ऊर्फ अकबर जलेल्या कैसर अली शेख (वय ३४, रा. शब्बीर नगर, २ हजार वस्ती, धुळे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याची अंगझडती आणि सोबतच्या असलेल्या वस्तूंची तपासणी केली असता त्यात गुंगीकार औषधे मिळून आली.
२७ हजार ३०० रुपयांंचा औषध साठा आणि १ हजार रूपये रोख असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शनिवारी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडली. त्याच्या विरोधात शनिवारी रात्री विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार घटनेचा तपास करीत आहेत.