आशियातील सर्वात मोठ्या योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या शुभारंभ, काय आहे ही योजना?
धोकादायक इमारतींचा सामूहिक पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे. धोकादायक, अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित विकास होणार आहे. अंमलबजावणी सिडकोमार्फत होणार
या योजनेच्या कामाची सुरुवात अंतिम भूखंड क्र.186/187 या वरील 7753 चौ.मी क्षेत्रफळावरील भूखंडावर होणार आहे. तसेच रस्ता क्रमांक 22 लगतचा भूखंड क्रमांक एफ- 3 या ठिकाणी 19275 चौ.मी. एवढ्या जागेवर विकास केला जाणार आहे. नागरी पुनरुत्थान 1 व 2 ची अंमलबजावणी सिडको या शासनाच्या कंपनीमार्फत होणार आहे.
समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
सुनियोजित संकुलामध्ये घर, पात्र निवासी लाभधारकास विनामूल्य 323 चौ. फूट मालकी हक्काचे घर तसेच प्रत्येक सेक्टरमध्ये सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांसाठी विशेष जागा उपलब्ध करून दिली जाईल. प्रत्येक सेक्टरमध्ये वाचनालय, व्यायामशाळा, आरोग्यकेंद्र आणि कम्युनिटी सेंटरची व्यवस्था राहणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र
पाळणाघरासह महिला सक्षमीकरण केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, अरुंद रस्ते आणि गजबजलेल्या गल्लीऐवजी प्रशस्त आणि दर्जेदार रस्ते राहतील. वाहतूक सुविधा, पाणीपुरवठा, मल व जलनि:स्सारण, घनकचरा व्यवस्थापनासह पायाभूत सुविधा राहणार आहेत.
पुनर्विकसित टाऊनशीप आराखड्यामध्ये सुसज्ज आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, उद्यान पार्किंग, मंडई आदी नागरी सुविधांचा समावेश या योजनेत आहे. प्रख्यात वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्या डिझाईननुसार टाऊनशीपची उभारणी केली जाणार आहे.