बारावी परीक्षेच्या ‘हस्ताक्षर घोटाळा’ प्रकरणी पोलीस ‘त्या’ 372 विद्यार्थ्यांनाचा जबाब नोंदवणार

बारावीच्या परीक्षेच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर आढळून आलेल्या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे.तब्बल 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर समोर आल्याने या प्रकरणात चौकशीअंती राहुल ऊसारे आणि मनिषा शिंदे दोन शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलिसांकडून याचा तपास केला जात असताना, या सर्व प्रकरणात आर्थिक व्यवहार झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे बोर्डाच्या चौकशीनंतर आता पोलिसांकडून देखील 372 विद्यार्थ्यांचा जबाब घेतला जाणार आहे.
बारावीच्या परीक्षेच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर आढळून आले होते. पुढे अधिक तपास केल्यावर एकाचवेळी 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचे चौकशीत समोर आले आणि यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. यासाठी बोर्डाने चौकशी समिती नेमली आणि ज्यात विद्यार्थी, परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कस्टडियनची, मॉडरेटर आणि प्राचार्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती पेपर तपासणारे राहुल ऊसारे आणि मनिषा शिंदे या दोन शिक्षकांवर सोयगावच्या फर्दापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र ते दोघेही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत.
दरम्यान पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाचा पोलीस सूक्ष्मपणे तपास करत आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणात आर्थिक व्यवहार झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. दोन्ही आरोपी शिक्षक फरार झाल्याने पोलिसांना यातील विशेष काही महिती अजूनही मिळू शकली नाही. तर ते हस्ताक्षर नेमकं कोणाचे हे देखील अधिकृत स्पष्ट होऊ शकले नाहीत. त्यामुळे आता पोलिसांकडून संबंधित 372 विद्यार्थ्यांना नोटीस पाठवून जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या एन्ट्रीनंतर या सर्व प्रकरणाचं खुलासा लवकरच होणार असल्याचा अंदाज आहे.
उत्तरपत्रिका 25 दिवस स्वतःकडे ठेवल्या…
गेल्यावर्षी झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर उत्तरपत्रिका तपासणी दरम्यान बीड, अंबेजोगाई, कान्होळा, पैठण या ठिकाणच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी आल्या असताना 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर आढळून आले होते. दरम्यान याची चौकशी केली असता या उत्तरपत्रिका सोयगावचे शिक्षक राहुल भंगवान ऊसारे आणि मनिषा भागवत शिंदे यांनी तपासले असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे त्यांना 13 मार्चपर्यंत या उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे आदेश होते. मात्र त्यांनी उत्तरपत्रिका 25 दिवस स्वतःकडे ठेवून 8 एप्रिल रोजी बोर्डाकडे परत पाठवल्या होत्या. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता.