कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ अनिल कुंबळे मैदानात.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंचा विरोध सुरुच आहे. कुस्तीपटूंनी इतर खेळाडूंना साथ देण्याचे आवाहन केले आहे.यातच, आता माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि इरफान पठाण यांनी त्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे.
दरम्यान, विनेश फोगट आणि इतर कुस्तीपटूंचा संघर्ष पाहून ट्वीट करत कुंबळे म्हणाले की, “28 मे रोजी आमच्या कुस्तीपटूंशी झालेल्या गैरवर्तनाबद्दल ऐकून खूप वाईट वाटले. योग्य चर्चेतून कोणतीही गोष्ट सोडवली जाऊ शकते. लवकरात लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.”
दुसरीकडे, इरफान पठाणनेही रविवारी रात्री ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. इरफान म्हणाला की, “आमच्या खेळाडूंचे हे दृश्य पाहून मला खूप वाईट वाटते. या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा निघावा.”
तसेच, कुस्तीपटूंचा विरोध जानेवारीपासून सुरु झाला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन कुस्तीपटूसह अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सुमारे महिनाभरापूर्वी, कपिल देव, वीरेंद्र सेहवाग हरभजन सिंग आणि शिखा पांडे हे क्रिकेटपटू होते, ज्यांनी सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी करत भारतातील अव्वल कुस्तीपटूंनी केलेल्या निषेधाबद्दल मत व्यक्त केले होते.