BMC: खिशात नाही अडका अन्.. पैसे नाहीत म्हणणाऱ्या BMC ची मोदींच्या कार्यक्रमात कोट्यवधीची उधळण
गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे- फडणवीस सरकारने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. अनेक प्रकल्पांच्या उद्घाटनाचे धडाके देखील लावण्यात आले आहेत. एकीकडे मुंबई महापालिकेला विविध विकासकामांसाठी मोठ्या निधीची गरज असताना उद्घाटन कार्यक्रमांवर मात्र कोट्यवधींचा खर्च केला जात असल्याचं समोर आलं आहे.गेल्या काही महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यानवेळी त्यांनी अनेक विकास कामांचे उद्घाटन केले आहे. जानेवारी २०२३मध्ये पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर आले होते. तेव्हा पालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले होते. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे झालेल्या या कार्यक्रमावर मुंबई महापालिकेने एका दिवसात तब्बल आठ कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. खर्चाच्या या प्रस्तावाला मुंबई पालिका आयुक्तांनी नुकतीच मंजुरीही दिली आहे.पंतप्रधान मोदी जानेवारीमध्ये २०२३च्या तिसऱ्या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या विविध विकासकामे आणि प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले होते. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेतील २० दवाखान्यांचे लोकार्पण, तसेच सात मलजल प्रक्रिया केंद्रे, महापालिकेच्या तीन रुग्णालयांच्या इमारती आणि ४०० किमीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
याचवेळी पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत लाखांहून अधिक फेरीवाल्यांना कर्ज वितरणाचा शुभारंभही मोदींच्या उपस्थितीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्यासाठी एका खासगी एजन्सीची नियुक्ती देखील करण्यात आली होती. या व्यवस्थापनासाठीची निविदा प्रक्रिया पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यातर्फे करण्यात आली होती.
दरम्यान या कार्यक्रमासाठी एजन्सीकडून अंदाजे १० कोटी ४५ लाख रुपयांचा खर्च सादर केला. मुंबई महापालिकेने या खर्चावरून एजन्सीसंदर्भात वाटाघाटी करून अखेर ८ कोटी ३७ लाख ८१ हजार रुपये खर्चावर शिक्कामोर्तबही करण्यात आले. कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर एजन्सीकडून मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभागाला याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला. हा अहवाल पडताळल्यानंतर एच पूर्व विभागाने त्यावर कार्यपूर्ती अहवाल सादर केला. कामाचा सर्व खर्च वस्तू व सेवा करासहित खर्च हा ८ कोटी ३३ लाख ५९ हजार ८५१ रुपये असल्याचे समोर आलं आहे. या खर्चाला मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडून कार्योत्तर मंजुरी मिळाली आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.