ठाकरे गट आणखी दोन पाऊलं मागं? राऊतांनी सांगितलं मविआतील जागा वाटपाचं नवं सूत्र
मुंबई, 31 मे : महाविकास आघाडीकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मात्र जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून 18 जागांवर दावा करण्यात आला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा फॉर्म्यूला समोर ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले राऊत? लोकसभेच्या जागा वाटपाबाबत एकच बैठक झाली.
जेवढ्या जागा आम्ही जिंकलो होतो तिथे उमेदवार तयार आहेत. उर्वरीत जागांबाबत चर्चा होईल. तिन्ही पक्षात प्रत्येकी 16 जागांच्या वाटपाचा प्रस्ताव कधी समोर आलाच नाही. आमचे 19 खासदार आहेत, मात्र एखाद्या जागेवर आमचा उमेदवार कमजोर असेल आणि तीथे महाविकास आघाडीतील दुसऱ्या घटक पक्षाचा ताकदवर उमेदवार असेल तर चर्चा करू, तो मोठेपणा उद्धव ठाकरे यांनी दाखवल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
भाजपला टोला दरम्यान भाजपकडून जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. यावरून देखील विनायक राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपनं कितीही आटापिटा केला तरी मंत्र्यांना प्रचारासाठी गल्लीत जाऊन फिरावं लागत आहे. भाजपने किती अध्यादेश बदलले तरी त्याचा फायदा आता होणार नाही, कर्नाटकात जे झालं तेच राजस्थान आणि महाराष्ट्रात होणार असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.