Post office मधून करा बक्कळ कमाई, घरबसल्या घ्या फ्रँचायजी; पाहा कुठे करायचा अर्ज
मुंबई : पोस्ट ऑफिसमधून नागरिकांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. ग्रामीण भागातल्या मोठ्या लोकसंख्येसाठी तर पोस्ट ऑफिस हे बँकिंग सेवेचं माध्यम आहे. कित्येक नागरिक पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात. पोस्टाच्या अल्पबचत योजना सर्वांत सुरक्षित मानल्या जातात. कारण त्यात गुंतवलेले पैसे बुडण्याची जोखीम नसते. म्हणूनच ग्रामीण भागातले नागरिक पै-पै जमवून आरडी, पीपीएफ किंवा एफडीसारख्या पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवतात. आता पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घेऊनही कमाई करणं शक्य आहे. त्यामुळे उत्पन्नाचा एक नवा स्रोत उपलब्ध होऊ शकतो. पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घेण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागत नाही. अवघ्या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीच्या साह्याने या उद्योगाची सुरुवात करता येऊ शकते. त्यातून चांगली कमाई होऊ शकते. पोस्ट ऑफिसचं नेटवर्क मोठं असलं, तरी अद्याप या नेटवर्कच्या विस्तारीकरणाला बराच वाव आहे. त्यामुळेच ते नेटवर्क वाढवण्यासाठी पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी दिली जात आहे. फ्रँचायजी घेणाऱ्या व्यक्तीचं वय किमान 18 वर्षं असलं पाहिजे, असा नियम आहे. भारतातला कोणीही नागरिक पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घेऊ शकतो. फ्रँचायजी घेऊ इच्छिणारी व्यक्ती मान्यताप्राप्त शाळेतून किमान आठवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. फ्रँचायजी घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी सर्वप्रथम अर्ज भरून तो सादर करायला हवा. आपल्या शैक्षणिक पात्रतेचं सर्टिफिकेटही सादर करावं लागतं. निवड झाली, तर ‘इंडिया पोस्ट’शी एक करार करावा लागतो. त्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या, की करार निश्चित होतो. पोस्ट ऑफिसच्या फ्रँचायजीमधून मिळणारं उत्पन्न हे कमिशनवर आधारित असतं. पोस्ट ऑफिसची प्रॉडक्ट्स, तसंच सेवा फ्रँचायजीने ग्राहकांना पुरवणं अपेक्षित असतं. त्या बदल्यात फ्रँचायजीला प्रत्येक व्यवहारामागे कमिशन मिळतं. हे कमिशन किती दिलं जाणार हे करार करतानाच निश्चित केलं जातं. फ्रँचायजी मिळाल्यानंतर त्याद्वारे पोस्टाच्या ग्राहकांना सेवा-सुविधा पुरवून त्यातून मिळणाऱ्या कमिशनमधून कमाई करता येते. रजिस्टर्ड आर्टिकल्सच्या बुकिंगवर तीन रुपये, स्पीड पोस्ट आर्टिकल्सच्या बुकिंगवर पाच रुपये, 100 ते 200 रुपयांच्या मनीऑर्डर बुकिंगवर 3.50 रुपये, 200 रुपयांपेक्षा जास्त रुपयांच्या मनीऑर्डर बुकिंगवर पाच रुपये असं कमिशन फ्रँचायजीला मिळतं. तसंच, दर महिन्याला रजिस्ट्रर्ड आणि स्पीड पोस्टच्या एक हजारांहून अधिक आर्टिकल्सचं बुकिंग फ्रँचायजीकडून झालं, तर 20 टक्के अतिरिक्त कमिशन मिळतं. त्यामुळे जनसंपर्क चांगला असेल, तर अशा व्यक्तींसाठी उत्पन्नाची चांगली सोय यातून होऊ शकते. पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घ्यायची असेल, तर या संदर्भातलं अधिकृत नोटिफिकेशन वाचणं गरजेचं आहे. ते https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf या लिंकवर उपलब्ध आहे. पोस्टाच्या या अधिकृत वेबसाइटवरूनच अर्ज करणं गरजेचं आहे. या अधिकृत वेबसाइटवर फॉर्म दिलेला आहे. तो फॉर्म डाउनलोड करावा आणि भरून पोस्टाकडे सादर करावा..