पुणे जिल्हा : पाबळ परिसरात कडवळ, बाजरी भुईसपाट

सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळीने झोडपले; वीज पडून गायीचा मृत्यू : खांब उन्मळून पडले. पाबळ – शिरूर तालुक्यातील पाबळ येथील वाड्या वस्त्यांवर सोमवारी (दि. 29) झालेल्या अवकाळी पाऊस व वादळाने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या तर काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले तर अनेक शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली कडवळ, बाजरीची पिके भुईसपाट झाली. तर एका शेतकऱ्याच्या गायीवर वीज पडल्यामुळे तीचा मृत्यू झाला. सुदैवाने जवळच असलेले कुटुंबातील सदस्य मात्र बचावले.
पाबळ परिसरात सोसाट्यावाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला. तब्बल दीड तास सुरू आलेल्या अवकाळी पावसाने झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. तर कोकम वस्तीतीतील सहा खांब उन्मळून पडले. तर अनेक ठिकाणी हातातोंडाला आलेली बाजरी, कडवळची पिके जमीनदोस्त झाली. अनेक ठिकाणी कडबा वाहून पाण्यावर तरंगत वाहून गेला तर थोरस्थळ येथील दादाभाऊ एकनाथ थोरवे या शेतकऱ्यांची गाय बांधलेल्या झाडावरच वीज पडून मरण पावली. यावेळी थोरवे यांचे कुटुंब बचावले.
या घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश कोल्हे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळवली. पाबळचे तलाठी रमेश घोडे, ग्रामविकास. अधिकारी आशिष भागवत, ग्राम पंचायत कर्मचारी फककड थोरवे यांनी पंचनामा केला तर पशुवैद्यकीय अधिकारी चिखले व पुंडे यांनी शवविच्छेदन करून अहवाल दिला.
वऱ्हाडी मंडळींची धांदल
पाबळ येथे घडलेल्या घटनेत एका विवाहानंतर वादळाने संपूर्ण मंडपाचे तुकडे झाले या घटनेत मोठे नुकसान झाले तर विवाहासाठी गेलेल्या पाबळ दुचाकीस्वरांना पावसाने झोडपून काढले.