पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेऊन 9 वर्षांत जनतेला काय दिलं हे सांगावे!

लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, ते त्यांना विचारू द्या. गेल्या 9 वर्षांत आपण जनतेला काय दिलं याबाबत पंतप्रधानांनी एक जाहीर पत्रकार परिषद घेणं गरजेचं आहे असं आव्हानच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना दिला.दहशतवाद कमी केला असं म्हणता मग मणिपूर काय सुरू आहे ? अर्थव्यवस्था मजबूत आहे, दोनवेळा नोटबंदी करून का फसली ? रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत का झाला. रुपया का पडतोय? देशाची अर्थव्यवस्था एकाच उद्योगपतीच्या हातात दिल्याने किती नुकसान झालं? एअर इंडिया एलआयसी सगळं का विकावं लागलं ? का विकताय , कोणासाठी विकताय? या जनतेच्या मनातील प्रश्नांची पंतप्रधानांनी उत्तरे द्यावीत अशी आमची प्रामाणिक इच्छा असल्याचे राऊत यांनी म्हटले.
सुषमा अंधारे यांच्या विनयभंगाच्या आरोपांप्रकरणी मिंधे गटाच्या संजय शिरसाट यांना क्लिनचीट देण्यात आली. याबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, आम्ही बनवू ती एफआयर आणि लिहू तोच गुन्हा अशा पद्धतीचा महाराष्ट्रात कारभार सुरू आहे. जर सुषमा अंधारेंविषयीबाबत केलेली विधाने ऐकली तर ती गंभीर आहेत. जर ती कायद्याला गंभीर वाटत नसतील तर सगळंच गंभीर आहे असं म्हणावं लागेल. राऊत यांनी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाचे समर्थन करताना म्हटले की, जयंत पाटील यांनी जे म्हटले आहे ते शंभर टक्के सत्य आहे. मिंधे गटात गेलेल्या आमदार खासदारांना भाजपच्याच चिन्हावर लढावं लागेल.
मुंबई महापालिकेत विजय मिळवण्याच्या भाजपच्या दाव्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी म्हटले की, ‘मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असं जेपी नड्डांपासून भाजपच्या इतर नेत्यांना वाटत असेल तर स्वत: शिवसेना म्हणवणारे, भाजप सरकारमध्ये सामील झालेले हे लोकं तोंडाला चिकटपट्टी लावून का बसले आहेत ? भाजपचा झेंडा हा मराठी माणसाचा झेंडा नाही. हा व्यापाऱ्यांचा आणि शेठजींचा झेंडा आहे. ज्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे अशा विचारांच्या लोकांचा हा झेंडा आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा फुटलेला गट हा गप्प का ?’