मोठी बातमी ! युतीला नवा भिडू मिळणार?, देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यरात्री चर्चा; दोन तास खलबतं
देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, मान्सूनपूर्व तयारी, युतीच्या आगामी सभा आणि दौरे यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.तसेच पावसाळी अधिवेशनापूर्वी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्यावरही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातच ही चर्चा झाली. यावेळी भाजपचा एकही नेता उपस्थित नव्हता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित नव्हते.
विस्तारावर चर्चा
सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षावर निकाल दिल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. युतीच्या नेत्यांनीही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे नव्या विस्तारात किती जणांचा सामावेश करायचा, या विस्तारात कुणाकुणाला संधी द्यायची, कुणाला संधी नाही द्यायची आणि कुणाच्या नावावर आक्षेप आहे, यावरही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच पावसाळी अधिवेशनापूर्वीच विस्तार होणार असल्याने त्यावरही या दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे.
समविचारी पक्षांना सोबत घेणार?
- राज्यात महापालिका निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशावेळी युती भक्कम करण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. काल देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे मनसे सोबत येईल की नाही यावरही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात नवीन समीकरणे होताना पाहायला मिळणार आहेत.