देवेंद्र फडणवीस प्रभारी नियुक्तीनंतर वर्षभराने नगरमध्ये; उद्या होणार मेळावा
नगर :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या शुक्रवारी 26 मे रोजी नगर शहरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा दुपारी बारा वाजता सावेडीमधील कोहिनूर मंगल कार्यालयात होणार आहे दरम्यान, नगर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर फडणवीस थेट वर्षभराने नगरमध्ये आले असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी दोन वाजता शिर्डी येथे होणार आहे.या कार्यक्रमास फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्या आधी सकाळी नगर शहरांमध्ये त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. फडणवीस हे गुरुवारी 25 मे रोजी सायंकाळी नगर शहरात येणार असून येथे मुक्काम करणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी 26 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते आढावा बैठक घेणार आहेत.
राज्य सरकारच्या विविध योजनांची नगर जिल्ह्यातील अंमलबजावणी तसेच त्यात येणाऱ्या अडचणींबाबत या आढावा बैठकीत ते माहिती घेतील. या बैठकीआधी नगरच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात नवे शासकीय विश्रामगृह उभारले जाणार असून त्याचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होणार असून ती झाल्यानंतर नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात छत्तीस कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या वुमन्स अँड चाइल्ड्स हॉस्पिटलचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. या भूमिपूजनानंतर दुपारी बारा वाजता कोहिनूर मंगल कार्यालयात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत आणि यानंतर शिर्डीला मार्गस्थ होणार आहेत व तेथे होणाऱ्या समृद्धी महामार्ग दुसरा टप्पा उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.