17 वर्षीय नर्सचे डॉक्टरसह तीन जणांशी प्रेमसंबंध; त्या तिघांनी मिळून केला ‘गेम’!
लखनौ : नर्स हत्या प्रकरणाचा खुलासा पोलिसांनी करत यात डॉक्टरसह तीन आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींची रवानगी तुरुंगात केली आहे. पोलिस तपासात तिन्ही आरोपींसोबत नर्सशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे तिघांनाही एकत्र येत तिची हत्या केली.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. रहिमाबाद येथील रहिवासी १७ वर्षीय प्रशिक्षणार्थी नर्स एका खासगी रुग्णालयात काम करत होती. १० एप्रिल रोजी सायंकाळी ती बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडलेला आढळून आला होता.
प्रशिक्षणार्थी नर्सचे अमित अवस्थी नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांनी ती न्यू मेडिप्लस हॉस्पिटलचे डॉ. अंकित सिंग आणि अमितचा मित्र दिनेश मौर्य याच्याही संपर्कातही आली होती. ती तिघांशीही बोलत असे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी या तिघांनाही ती आपल्याला फसवत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अमित, अंकित आणि दिनेश यांनी मिळून प्रशिक्षणार्थी नर्सच्या हत्येचा कट रचला. १० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास अमितने मुलीशी संपर्क साधून तिला आपल्या बागेत नेले. येथेच तिचा गळा दाबून खून करण्यात आला.
आईने केला नस कापण्याचा प्रयत्न
मुख्य आरोपी अमित अवस्थी याच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. आरोपीची आई कल्पना यांनी आरोप केला की, पोलिसांनी ३ लाख रुपये घेऊन आपल्या मुलाला या प्रकरणात गोवले आहे. दरम्यान, त्यांनी बांगड्या तोडल्या आणि त्यानेच नस कापण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.
पोलिसांकडून टाळाटाळ
पोलिसांनी या तिघांनाही चौकशीसाठी आणले. गंभीर चौकशी न करता त्यांना सोडून दिले. तेव्हा पोलिस आत्महत्या असल्याचा युक्तिवाद करत होते. मात्र, वरिष्ठांनी खडसावल्यानंतर पोलिसांनी हत्येचा तपास सुरू करत पुरावे गोळा करून आरोपींंना अटक केली.
व्हॉट्सॲप चॅट आले समाेर
९ एप्रिलच्या रात्री प्रशिक्षणार्थी नर्स आरोपी अंकितच्या फ्लॅटवर थांबली होती. इथे आणखी दोन लोक होते. दुसऱ्या दिवशी अमितने तिच्याशी संपर्क साधून बोलवून घेतले होते. पोलिसांनी आरोपींच्या मोबाइलची झडती घेतली असता त्यात काही कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सॲप चॅट सापडले, त्यात आरोपी नर्सच्या हत्येबाबत बोलत आहेत.