पशुसंवर्धन विभागाचा १३१ वा वर्धापन दिन पुणे जिल्ह्यात उत्साहात साजरा
पुणे:पशुसंवर्धन विभागाची स्थापना इंग्रजांच्या काळात २० मे १८९२ रोजी मुंबई प्रांतात झाली. त्या काळात वाहनांची सुविधा नसल्यामुळे मुलकी कामासाठी घोडयांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे, त्या घोडयाची देखरेख करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची स्थापना करण्यात आली.
दर वर्षी २० मे हा दिवस पशुसंवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. आज रोजी महाराष्ट्रात ४,८४८ पशुवैद्यकीय संस्था मार्फत पशुआरोग्य सुविधा पुरवण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थामध्ये पशुसंवर्धन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, जनावरांचे वंधत्व निवारण शिबीर आयोजन करून साजरा करण्यात आला.
सदर शिबिराला पशुसंवर्धन अधिकारी डॉ दत्ता काकडे यांनी भेटी देत मार्गदर्शन केले. आयोजित चर्चा सत्रामध्ये पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर चर्चा सत्रामध्ये, प्रामुख्याने जनावरांमधील वंधत्व निवारण, उन्हाळ्या मधील पशूचे व्यवस्थापन, मान्सून पूर्व लसीकरणाचे महत्त्व, दुग्ध व्यवसाय वृद्धिगत करणे, कृत्रिम रेतनाचे महत्त्व, जनावरांच्या निकोप वाढीसाठी योग्य व चांगल्या वैरणीचे व्यवस्थापन आणि पशुसंवर्धन विभागामार्फत राबिवण्यात येणाऱ्या योजनांन विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
पशुपालनाचे महत्व आणि पशुपालनातून मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन पशुसंवर्धन विषयक अनेक कार्यक्रम राबिवण्यात येतात. दुग्ध व्यवसाय, कुकूट पालन, अंडी उत्पादन, शेळी पालन आणि वराह पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाण्यात जाऊन आपल्या व्यवसायाची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे करणे या विषयी पशुपालकांना आहवान पशुसंवर्धन अधीकारी डॉ. दत्ता काकडे यांनी केले.