क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

मणक्यात इंजेक्शन दिल्याने रुग्णाचा मृत्यू; तब्बल वर्षभरानंतर डॉक्टरवर गुन्हा दाखल


अकोला:मणक्यात इंजेक्शन दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप तेल्हारा येथील डॉक्टरवर करण्यात आला होता. या प्रकरणी चौकशी करून तब्बल वर्षभरानंतर आरोपी डॉक्टरवर तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेल्हारा येथील गोमती नामक खासगी क्लिनीकमध्ये डॉ. डी. एन. राठी यांनी १६ मे २०२२ रोजी दिलीप लक्ष्मणराव माळेकर (रा. वाशीम) या रुग्णावर केलेल्या उपचारादरम्यान तो मरण पावला होता. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला होता. डॉ. डी. एन. राठी यांनी मणक्यात इंजेक्शन दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

शवचिकित्सा अहवाल, सी.ए. अहवाल, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय समितीचा अहवाल यावरून आरोपी डॉ. डी.एन. राठी यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दवाखान्यातील कागदपत्रे देखील नष्ट केल्याचे चौकशीत समोर आले. रुग्णाच्या मरणास कारणीभूत असल्याच्या आरोपाप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे यांच्या फिर्यादीवरून डॉ. द्वारकादास नारायणदास राठी याच्याविरुद्ध तेल्हारा पोलीस ठाण्यामध्ये भादंविच्या ३०४, २०१ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button