आता लोकल ट्रेनही करणार वीज निर्मिती..
मुंबई:मुबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली लोकल रेल्वे सेवा ही दिवसाचे काही तास वगळता अव्याहत सुरू असते. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. त्यांचा प्रवास अविरतपणे सुरू राहावा यासाठी अखंडित वीजपुरवठा करणं हे एक आव्हानात्मक काम रेल्वे प्रशासनापुढे असतं.
रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी अधिक विजेची गरज आहे. ती गरज आता लवकरच पूर्ण होणार आहे.
पश्चिम रेल्वेने प्रायोगिक तत्वावर वीजनिर्मितीसाठी पवनचक्क्या बसवल्या आहेत. गंमत म्हणजे, वेगाने धावणाऱ्या लोकलच्या वाऱ्याचा वापरच या पवनचक्क्या चालवण्यासाठी होणार आहे. खार रोड आणि नायगाव या पश्चिम रेल्वेच्या दोन स्थानकांवर हा अभिनव प्रयोग करण्यात आला आहे. सर्वसाधारण पवनचक्क्यांपेक्षा यांची रचना थोडी वेगळी आहे. या पवनचक्क्यांची पाती अरुंद असून ती ऊर्ध्व दिशेकडे वळवलेली आहेत. या चक्क्यांची उभारणी दोन रेल्वे रुळ मार्गांच्या मध्ये करण्यात आली आहे. खार आणि नायगाव ही दोन अशी स्थानकं आहेत, ज्यांच्या नंतर किंवा आधी एक मोठं स्थानक येतं आणि तिथे बहुतांश जलद मार्गावरील लोकल थांबतात. त्याचा फायदा या पवनचक्क्यांना होणार आहे.
दोन्ही बाजूंनी जलद मार्ग असल्याने वेगाने जाणाऱ्या लोकलमुळे या चक्क्यांची पाती हलून त्याखाली असलेल्या विद्युत जनित्रामुळे वीजनिर्मिती शक्य होणार आहे. या विजेचा वापर लोकल रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी करण्यात येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर दोन्ही स्थानकांत प्रत्येकी पाच चक्क्या बसवण्यात आल्या असून त्यातून प्रत्येकी 400 वॅट्स इतकी वीजनिर्मिती होऊ शकते. विशेष म्हणजे यांना सौरउर्जेच्या पॅनल्सचीही जोड देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्हींद्वारे सुमारे 2 हजार वॅट्स इतकी वीजनिर्मिती शक्य आहे.