पाच कोटींची खंडणी प्रकरण,पोलिसांच्या अंगावरच घातली ..
पुणे : पाटस येथील एका व्यावसायिकाला पाच कोटींची खंडणी (Extortion of Five Crores) मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सोलापूर येथील बोगस पत्रकार व त्याच्या भावावर पाटस येथे पोलिसांवर गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा (Attack on Police) प्रयत्न करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि पोलिसांमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार पाहिला मिळाला.
महेश सौदागर हनमे (वय ४७) , दिनेश सौदागर हनमे (वय ४४, दोघेही रा. राजेश्वरीनगर, बोळे, उत्तर सोलापूर जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे येथील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये महेश हनमे याच्यावर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या महेश हनमे याला अटक करण्यासाठी पुणे येथील खंडणी विरोधी पोलीस पथकाने त्याच्या गाडीचा पाठलाग केला होता.
गुरुवारी (दि.18) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या आसपास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोलनाक्यापासून अंदाजे पाचशे मीटर अंतरावर या आरोपींची गाडी थांबवण्याचा प्रयत्न या पोलीस पथकाने केला. मात्र, त्यांनी पोलिसांवर दगडाने व हाताने मारहाण करून फोर्ड फिएस्टा गाडी (एमएच 14 बीके 4484) खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर घातली.
तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला, अशी फिर्याद पोलीस हवालदार सुरेंद्र दिलीप जगदाळे यांनी यवत पोलीस ठाण्यात दिल्याने या दोघांवर सरकारी कामात अडथळा आणणे व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.