नंदुरबार जिल्ह्यातून सात जण दोन वर्षांसाठी हद्दपार
नंदुरबार : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारांवर वचक राहावा याकरिता जिल्हा पोलिस दलाने नंदुरबार तालुक्यातील सात जणांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणारे तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्यांची माहिती घेतली. त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला असता नंदुरबार तालुका पोलिस ठाणे हद्दीतील काही आरोपी त्यांची दहशत व वचक ठेवण्यासाठी बेकायदेशीररीत्या टोळी तयार करून नियमितपणे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करण्याचे सवयीचे असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यापासून सामान्य नागरिकांच्या मालमत्तेस व जीवितास धोका निर्माण झालेला असल्याचे त्यांना आढळून आले. त्याप्रमाणे अशा आरोपींवर कठोर प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक असल्याने हद्दपारीचा निर्णय घेण्यात आला.
नंदुरबार तालुका पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या टोळीतील सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यावरून नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याकडून एका टोळीस हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला. त्यानुसार हे आदेश काढण्यात आले. अर्जुन भिला पवार (२४)रा. चाकळे ता. नंदुरबार, सागर शिवनाथ पाडवी (१९)रा. चाकळे, ता. नंदुरबार, लखन बापू भिल (२२) रा. शनिमांडळ, ता. नंदुरबार, ज्ञानेश्वर वसंत मोरे (१९) रा. शनिमांडळ, ता. नंदुरबार, न्हानभाऊ भगवान भिल (२५) रा. शनिमांडळ, ता. नंदुरबार, किरण मंगलसिंग भिल (२५), रा. तिलाली, ता.नंदुरबार, विपुल सुरेश कोळी (२३), रा. तिलाली, ता.नंदुरबार यांचा समावेश आहे.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.