साईबाबा संस्थानकडील चिल्लरवर अखेर तोडगा
नगर:देश-विदेशांतील भाविकांकडून श्री साईबाबांच्या दानपेटीत जमा होणाऱया नाण्यांचा मोठा साठा बँकांत पडून राहिल्याने निर्माण झालेल्या प्रश्नावर रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, 13 राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी आणि साई संस्थान अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत तोडगा काढण्यात आला आहे.
टंचाई असलेल्या ठिकाणी ही चिल्लर पाठविण्यात येणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
साईबाबांच्या दानपेटीत जमा होणारे नाणे मोठय़ा प्रमाणावर असून, 13 राष्ट्रीयीकृत बँकांच्या 36 शाखांमध्ये नाणे ठेवायलाही जागा शिल्लक नसल्याने याबाबत बँकांपुढे मोठी समस्या निर्माण झाली होती. याबाबत आरबीआयचे जनरल मॅनेजर मनोज रंजनदास यांच्या उपस्थितीत साई संस्थानचे खाते असलेल्या 13 राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी आणि साई संस्थानचे सीईओ राहुल जाधव यांच्यात संयुक्त बैठक होऊन तोडगा काढण्यात आला आहे.
याबाबत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव म्हणाले, साईबाबा संस्थानकडून बँकांच्या ज्या शाखेत मोठय़ा प्रमाणावर नाणे पडून आहेत, ती नाणी तुटवडा असलेल्या संबंधित बँकांच्या इतर शाखांमध्ये पाठविली जाणार आहे. त्यामुळे बँकांपुढे निर्माण झालेला प्रश्न सुटला आहे. तसेच दानातील नाण्यांची मोजदाद करताना विलगीकरणासाठी बँकांना मनुष्यबळाची येत असलेली अडचण दूर करण्यात आली आहे. यापुढे साई संस्थानकडून नाण्यांचे विलगीकरण करण्यात येऊन ती बँकांकडे दिली जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
‘शिर्डी बंद’ आंदोलन मागे
शिर्डीच्या साई मंदिरात केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षा लागू केली जावी, अशी याचिका सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केल्यानंतर उच्च न्यायालयाने साई मंदिर प्रशासनाला सुरक्षा लागू करण्याचे निर्देश दिले होते. साई मंदिर प्रशासनाने केंद्रीय सुरक्षा लागू करण्यास सहमती दर्शविल्याची माहिती कळताच शिर्डीतील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. 1 मेपासून बेमुदत ‘शिर्डी बंद’चा नारा देण्यात आला होता. मात्र, आज ग्रामस्थांनी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतल्यानंतर आपले आंदोलन मागे घेतले आहे. या निर्णयाविरोधात आता ग्रामस्थांच्या वतीने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका करण्यात येणार असून, ग्रामसभेत ठराव घेऊन ग्रामस्थांच्या मागण्या उच्च न्यायालयापर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. याविषयी राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडणार असल्याचे विखे-पाटील म्हणाले. 1 मे रोजी द्वारकामाईसमोरील नाटय़गृहासमोर ग्रामसभा होणार असून, त्यामध्ये हा ठराव एकमताने घेण्यात येणार आहे.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.